‘क्वाड’मुळे अस्वस्थ झालेल्या चीनचे असियान देशांना आमिष

बीजिंग – भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या ‘क्वाड’ संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील देशांच्या वाढत असलेल्या उत्सुकतेमुळे बेचैन झालेल्या चीनने आपल्या शेजारी असियान देशांशी जुळवून घेण्यासाठी तयारी केली आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी असियान देशांचा दौरा सुरू करुन कोरोनाव्हायरस विरोधी लस पुरविण्याचे तसेच व्यापारी सहकार्य वाढविण्याचे आमिष दाखविले आहे. असियान देशांना सहकार्य देत असताना, ‘क्वाड’ ही संघटना व अमेरिकेबरोबरचे सहकार्य आग्नेय आशियाई देशांच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचे पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्‍न परराष्ट्रमंत्री वँग ई करीत असल्याचे समोर आले आहे.

असियान

गेल्या आठवड्यात चीनच्या परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी असियान देशांचा तातडीचा दौरा केला. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्या आग्नेय आशियाई देशांच्या दौर्‍यानंतर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हा दौरा केला आहे. गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि लाओस या पाच आग्नेय आशियाई देशांना भेटी देऊन आर्थिक व इतर सहकार्याचा प्रस्ताव दिला होता. त्याचबरोबर चीनच्या विस्तारवादी धोरणाविरोधात खड्या ठाकलेल्या ‘क्वाड’मध्ये सहभागी होण्याचा प्रस्तावही अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी या असियान देशांना दिला.

‘साऊथ चायना सी’मधील अमेरिकी युद्धनौकांच्या वाढत्या गस्तीला व्हिएतनाम, फिलिपाईन्स या देशांचे वाढते समर्थन मिळत आहे. फिलिपाईन्सने अमेरिकेला नौदल तळ देण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत असियान देश देखील ‘क्वाड’मध्ये सहभागी झाले तर या क्षेत्रातील चीनच्या वर्चस्ववादाला धक्का बसेल, याची चिंता चीनला सतावू लागली आहे. या पार्श्वभूमीवर, चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी तातडीने थायलंड, मलेशिया, लाओस, कंबोडिया या देशांना भेटी देऊन मुक्त व्यापार कराराचा प्रस्ताव दिला. त्याचबरोबर या देशांना वैद्यकीय सहाय्याबरोबरच चीन तयार करीत असलेली कोरोना प्रतिबंधक लस पुरविण्याचे आश्वासनही चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी दिले. त्याचबरोबर असियान देशांनी अमेरिकेच्या या ‘क्वाड’मध्ये सहभागी होऊ नये, अशी सूचना वँग यांनी केली.

‘क्वाड’ ही संकल्पना अमेरिकेच्या शीतयुद्धाच्या मानसिकतेतून निर्माण झाली असून या क्षेत्रातील देशांचा स्वतंत्र गट तयार करुन दुसर्‍या गटाबरोबर स्पर्धा भडकवून देण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्‍न सुरू आहेत. आग्नेय आशियाई देशांवर वर्चस्व मिळविण्यासाठी अमेरिका हे सारे करीत आहेत. ‘क्वाड’ ही संघटना असियान देशांच्या एकजुटीला आव्हान देणारी असून या क्षेत्राच्या सुरक्षेसाठी आव्हान असल्याचा आरोप चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केला. आग्नेय आशियाई देशांच्या या दौर्‍यानंतर चीनच्या सरकारी माध्यमांशी बोलताना वँग यांनी ही माहिती दिली. त्याचबरोबर इंडो-पॅसिफिक देशांची क्वाड संघटना उभी करण्याच्या अमेरिकेच्या प्रयत्‍नांना यश मिळू देणार नसल्याचे चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट केले.

याआधी असियान देशांना धमकाविणार्‍या चीनवर विश्वास ठेवण्यासाठी असियानचे सदस्य देश पुढे येण्याची फारशी शक्यता नाही. या देशांचा विश्वास चीनने गमावला असून याची जबर किंमत चुकती करणाची वेळ आलेली आहे, याची जाणीव चीनला होऊ लागली आहे. म्हणूनच अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या चीनविरोधी आघाडीत सहभागी होऊ नका, असे आवाहन चीनकडून केले जात आहे. पण आपल्या आर्थिक व लष्करी सामर्थ्याच्या बळावर आग्नेय आशियाई देशांना कसपटासमान लेखणार्‍या चीनला धडा शिकविण्यासाठी आग्नेय आशियाई देश तसेच ब्रिटन, फ्रान्स, व कॅनडा हे देश देखील पुढाकार घेत आहेत. यामुळे चीनची तारांबळ उडाल्याचे वँग ई यांच्या आग्नेय आशियाई देशांच्‍या दौर्‍यावरुन जगजाहीर झाले आहे.

leave a reply