भारताच्या सुरक्षेला चीनपासून सर्वाधिक धोका असल्याच्या संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांच्या विधानांवर चीनचा आक्षेप

बीजिंग – चीन हा भारताच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका ठरतो, असे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटले होते. त्याची दखल घेऊन चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्यांनी याचा निषेध नोंदविल्याची माहिती दिली. हा निषेध चीनने भारताकडे कुठल्या स्तरावर व कधी नोंदविला याचे तपशील या प्रवक्त्यांनी उघड केलेले नाहीत. पण जनरल रावत यांचा थेट नामोल्लेख न करता भारतीय लष्करी अधिकार्‍यांची ही विधाने बेजबाबदार व घातक असल्याची टीका चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते सिनिअर कर्नल वु कियान यांनी केली आहे.

भारताच्या सुरक्षेला चीनपासून सर्वाधिक धोका असल्याच्या संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांच्या विधानांवर चीनचा आक्षेपलडाखच्या एलएसीवरील तणाव वाढलेला असताना, चीन भारताबरोबर व्यापारी तसेच राजनैतिक सहकार्य सुरळीत ठेवण्याची फाजिल अपेक्षा व्यक्त करीत आहे. मात्र लडाखपासून अरुणाचलप्रदेशपर्यंतच्या एलएसीवरील चीनच्या कारवायांवर देशाचे लष्करी तसेच राजकीय नेतृत्त्व कणखर भूमिका स्वीकारीत असून उघडपणे चीनच्या चिथावणीखोर कारवायांना लक्ष्य करीत आहे. विशेषतः संरक्षणदलप्रमुख, लष्करप्रमुख चिनी लष्कराची या क्षेत्रातील तैनाती, घुसखोरीचे प्रयत्न यावर सडकून टीका करीत असून एलएसीवरील तणावाला चीनच जबाबदार असल्याचे ठासून सांगत आहे. संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना भारताच्या सुरक्षेला पाकिस्तानपेक्षा चीनपासूनच अधिक धोका संभवतो, असे म्हटले होते. त्याचवेळी भारतीय संरक्षणदलांनी कुठल्याही आव्हानांना तोंड देण्याची पूर्ण सज्जता ठेवलेली आहे, असेही जनरल रावत पुढे म्हणाले होते.

त्यांच्या या विधानांचा दाखला देऊन चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल कियान यांनी ही बेजबाबदार विधाने असल्याचा ठपका ठेवला. भारत व चीनच्या नेत्यांनी एकमेकांच्या देशांचा उल्लेख धोका असा करू नये, असे धोरणात्मक पातळीवर निश्‍चित केले होते. भारताच्या लष्करी अधिकार्‍यांची बेजबाबदार व घातक विधाने या निर्णयाच्या विरोधात जाणारी ठरतात, असा दावा कर्नल कियान यांनी केला. तसेच या विधानांची दखल घेऊन चीनने भारताकडे याचा निषेध नोंदविल्याची माहिती कर्नल कियान यांनी दिली. पण याचे तपशील उघड करण्यात आलेले नाहीत.

भारताच्या सुरक्षेला चीनपासून सर्वाधिक धोका असल्याच्या संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांच्या विधानांवर चीनचा आक्षेपएकीकडे भारताच्या एलएसीजवळ प्रचंड प्रमाणात लष्करी तैनाती करून चीन भारताला याच्या दडपणाखाली ठेवू पाहत आहे. तर दुसर्‍या बाजूला चीनला भारताबरोबर व्यापारी सहकार्य कायम ठेवायचे आहे. त्यामुळे सीमेवरील आपल्या चिथावणीखोर कारवायांचा आपल्या व्यापारी हितसंबंधांवर परिणाम होऊ नये, अशी विचित्र अपेक्षा चीन भारताकडून ठेवत आहे. मात्र परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकूंद नरवणे यांनी वारंवार चीनच्या घुसखोरीचे प्रयत्न तसेच इतर चिथावणीखोर कारवायांचा सातत्याने पर्दाफाश करण्याची ठाम भूमिका स्वीकारलेली आहे. त्याचवेळी चीन लडाख तसेच अरुणाचल प्रदेशच्या एलएसीबाबत करीत असलेला अपप्रचार हाणून पाडण्यासाठी संरक्षणदलांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पुढाकार घेतल्याचेही स्पष्ट होत आहे.

संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी चीनच्या प्रचारयुद्धाला बळी पडू नका, करण चीनला तेच हवे आहे, असे माध्यमांना बजावले होते. त्याचवेळी भारताची एक इंचभर भूमी देखील चीनच्या हाती पडू देणार नाही, अशी ग्वाही संरक्षणदलप्रमुखांनी दिली होती. तसेच चीनने अरुणाचल प्रदेशच्या एलएसीवर गाव वसविल्याचे विपर्यास्त दावेही संरक्षणदलप्रमुखांनी खोडून काढले होते.

leave a reply