ताजिकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारून चीन अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळविण्याच्या तयारीत

लष्करी तळ मॉस्को – ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवरील वाखण कॉरिडोरजवळ चीन लष्करी तळ आणि टेहळणीचे केंद्र उभारत आहे. ताजिकिस्तानच्या सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने माध्यमांनी ही बातमी दिली. मात्र चीनने ही बातमी फेटाळली. पण चीनचा अफगाणिस्तानातील खनिजसंपत्तीवर डोळा असून यावर नियंत्रण मिळविण्यासाठी चीन आसुसलेला आहे, हे याआधीही स्पष्ट झाले होते. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर तालिबानला हाताशी धरून चीन अफगाणिस्तानच्या साधनसंपत्तीची लूटमार करण्याची तयारी करीत असल्याचे संकेत यामुळे मिळत आहेत.

ताजिकिस्तानच्या अफगाणिस्तान सीमेजवळ चीन लष्करी तळ उभारत आहे. गेल्या काही वर्षांपासून चिनी जवानांनी या ठिकाणी टेहळणी केंद्र उभारुन पुढे त्याचा विस्तार केल्याचा दावा केला जातो. ‘रेडिओ अझातिक’च्या स्थानिक बातमीदाराने यांबंधीची माहिती समोर आणली होती. चीनच्या या लष्करी तळाचे फोटोग्राफ्सही यानिमित्ताने समोर आले होते. स्थानिकांनी देखील चिनी जवानांची उपस्थिती वाढत असल्याचे सांगितले होते.

लष्करी तळअफगाणिस्तानच्या बडाख्शान प्रांताजवळच चीनचा हा लष्करी तळ असल्याचा दावा केला जातो. बडाख्शान प्रांताची सीमा चीनच्या झिंजियांग प्रांताशी जोडलेली आहे. या सीमेतून उघूर बंडखोर चीनमध्ये घुसखोरी करू शकतात, अशी भीती चीनला वाटत आहे. त्यामुळे चीन ताजिकिस्तानमध्ये हा लष्करी तळ उभारत असल्याचा दावा केला जातो. पण याआधी अफगाणिस्तानातील बगराम हवाईतळावरही चीनचे लष्कर दाखल झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. बगराम हवाईतळाजवळ राहणार्‍या अफगाणींनी चिनी जवानांना पाहिल्याचा दावा केला होता. पण चीन तसेच तालिबानने हे दावे फेटाळले होते.

अफगाणिस्तानचे सामरिक महत्त्व व या देशातील अब्जावधी डॉलर्सची खनिजसंपत्ती यावर चीनचा डोळा आहे. यासाठी चीन ताजिकिस्तानातील या तळाचा वापर करणार असल्याचे उघड झाले आहे. याआधी चीन अफगाणिस्तानातील आपले हेतू साधण्यासाठी पाकिस्तानचा वापर करणार असल्याचे संकेत मिळाले होेते. पण गेल्या काही दिवसात चीन पाकिस्तानवर नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

leave a reply