चीन लडाखच्या सीमेवरुन सैन्य मागे घेण्याच्या तयारीत

नवी दिल्ली – अखेर भारताच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या चर्चेनंतर चीनने लडाखमधून माघार घेण्याची तयारी दाखविली आहे. असे असले तरी, याआधी विश्वासघात करणाऱ्या चीनवर विश्वास ठेवायला भारतीय लष्कर तयार नाही. गलवान व्हॅली, पँगाँग त्सो आणि हॉट स्प्रिंग या ठिकाणाहून माघार घेणाऱ्या चीनच्या लष्करावर भारतीय सैन्याची करडी नजर रोखलेली असेल.

China-Ladakhचीनने गलवान व्हॅली, पँगॉन्ग त्सो आणि हॉट स्प्रिंग्स या भागातून सैन्यमाघारी घेण्याचे मान्य केल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्याचबरोबर येत्या काळात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झटापटी होणार नाही, यासाठी बफर झोन तयार करण्याचे चीनने कबूल केले आहे. पण चीनवर विश्वास ठेवण्यास भारतीय लष्कर तयार नाही. वाटाघाटीत मान्य केलेल्या गोष्टींची चीन अंमलबजावणी करत नाही. त्यामुळे चीनच्या माघारीची पूर्ण खात्री पटल्याखेरीज इथला तणाव कमी होणार नाही, असे भारताने चीनला बजावले आहे.

तीनही भागातील चीनच्या सैन्य माघारीनंतर किमान ७२ तास भारतीय लष्कर सदर भागावर करडी नजर ठेवून असतील. चीनच्या लष्कराने माघार घेतल्याचे पुरावे समोर आल्यानंतरच भारतीय लष्कर पुढील निर्णय घेईल. या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपल्या सैन्यतैनातीत कुठल्याही प्रकारची ढिलाई दाखविलेली नाही. गेल्या चोवीस तासात भारतीय लष्कराच्या सीमेवरील हालचालीत बदल झालेला नसून लष्कराचे किमान दोन डिव्हिजन्स म्हणजे २० हजार सैनिक या भागात तैनात केले आहेत. त्याचवेळी वायुसेनाप्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी आपल्या अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, सतत भारताच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या ग्लोबल टाईम्सने देखील सीमावादावर सामोपचाराने सोडविण्याची बातमी दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही हा वाद अधिक चिघळू न देण्यावर एकमत झाल्याचे म्हटले आहे. चीनने स्वीकारलेल्या या नरमाईला भारताने घेतलेले आक्रमक निर्णय जबाबदार असल्याचे दिसते. चीनवर आर्थिक प्रहार करणाऱ्या निर्णयांचा सपाटा लावून चीनला भयंकर परिणामांची जाणीव करुन दिली होती. यामुळे याचे परिणाम दिसू लागले असून चीनच्या भूमिकेत झालेला बदल हेच संकेत देत आहे.

leave a reply