रशिया व चीनकडून महत्त्वाकांक्षी ‘मून बेस’ची घोषणा

सेंट पीटर्सबर्ग – रशिया व चीनने चंद्रावर स्वतंत्र तळ उभारण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात चंद्रावर मोहीम पाठविण्यात येणार असून पुढील दशकात ‘मून बेस’ कार्यरत झालेला असेल, असे संकेत दोन्ही देशांकडून देण्यात आले आहेत. रशियात नुकत्याच झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अवकाश परिषदेदरम्यान दोन्ही देशांनी अंतराळातील सहकार्य अधिक वाढविण्याचेही जाहीर केले. रशिया व चीनचे हे वाढते अंतराळ सहकार्य अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांच्या प्रभावाला थेट आव्हान देणारे असल्याचे मानले जाते.

‘मून बेस’काही दिवसांपूर्वीच अमेरिकेची अंतराळसंस्था ‘नासा’च्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या ‘आर्टेमिस ऍकॉर्डस्’वर ब्राझिलने स्वाक्षरी केली होती. ब्राझिल हा या करारावर स्वाक्षरी करणारा १२ वा देश ठरला आहे. या कराराच्या माध्यमातून अमेरिका अंतराळक्षेत्रासाठी स्वतंत्र आघाडी विकसित करीत असल्याचे सांगण्यात येते. या करारात चंद्रावरील अंतराळ मोहिमसेसह चंद्रावर असणारी खनिजसंपत्ती व इतर व्यावसायिक बाबींचाही समावेश आहे. अमेरिकेने जगातील सर्व देशांना करारासाठी आमंत्रित केले असले तरी रशिया व चीन त्यात सहभागी होणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.

१९५०-६०च्या दशकात अंतराळात पहिला उपग्रह व पहिला अंतराळवीर पाठवून तत्कालिन ‘सोव्हिएत रशिया’ने अंतराळक्षेत्रात जबरदस्त आघाडी घेतली होती. मात्र गेल्या दोन दशकात रशिया या आघाडीवर मागे पडताना दिसत असून त्यामागे निधीची कमतरता हे प्रमुख कारण मानले जाते. रशिया पिछाडीवर पडत असतानाच चीन वेगाने अंतराळक्षेत्रात आपला प्रभाव वाढविताना दिसत आहे. चीनच्या अंतराळक्षेत्रातील प्रवेशापासून ते अनेक अंतराळमोहिमांमध्ये रशियाचे सहकार्य हा महत्त्वाचा घटक राहिला आहे.

‘मून बेस’याच पार्श्‍वभूमीवर गेल्या काही वर्षात दोन्ही देशांनी अंतराळक्षेत्रात संयुक्त मोहिमा राबविण्यासाठी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी याबाबत आग्रही भूमिका घेतली असून व्यापक अंतराळ सहकार्य करारांवर स्वाक्षर्‍याही केल्या आहेत. रशियाकडे अंतराळक्षेत्रातील मोहिमांसाठी आवश्यक तंत्रज्ञान तसेच कौशल्य असून चीनकडे मोठ्या प्रमाणात निधी व मनुष्यबळ उपलब्ध आहे. या गोष्टी एकत्र आणून अंतराळात स्वतंत्र आघाडी उभारण्यासाठी दोन्ही देश वेगाने पावले उचलत आहेत.

चंद्रावर उभारण्यात येणारा ‘इंटरनॅशनल ल्युनार रिसर्च स्टेशन’ हा तळ त्याचाच भाग मानला जातो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हा तळ उभारण्यात येणार असल्याची माहिती रशिया व चीनच्या अंतराळसंस्थांनी दिली आहे. या तळाबरोबरच चंद्राच्या भ्रमण कक्षेत एक ‘स्पेस स्टेशन’ही विकसित करण्यात येणार आहे.

या महत्त्वाकांक्षी ‘मून बेस’साठी पहिली मोहीम ऑक्टोबर महिन्यात पाठविण्यात येणार असल्याची घोषणा दोन्ही देशांकडून करण्यात आली. रशिया व चीनकडून करण्यात आलेल्या दाव्यांनुसार, सदर तळ पुढील दशकाच्या अखेरपर्यंत कार्यरत होऊ शकतो. चीनने नुकतेच स्वतंत्र अंतराळस्थानक उभारण्यासाठी यशस्वी मोहीम राबविल्याचे समोर आले असून चंद्रावरील तळ चीनचे अंतराळातील वर्चस्व अधिक वाढविणारा ठरु शकतो.

रशिया व चीनकडून अंतराळात सुरू असणार्‍या हालचालींवर अमेरिकेसह पाश्‍चात्य देशांनी यापूर्वीच टीका केली आहे. या दोन्ही देशांच्या हालचाली संशयास्पद असून ते अंतराळाचे लष्करीकरण करीत असल्याचा आरोप अमेरिकी अधिकार्‍यांकडून करण्यात आला आहे. तर रशिया व चीनच्या अंतराळातील आक्रमकतेला ब्रिटन प्रत्युत्तर देईल, असा उघड इशारा ब्रिटनच्या संरक्षणमंत्र्यांनी गेल्या वर्षी दिला होता.

leave a reply