क्वाडमधील सहभागावरून चीनची बांगलादेशला धमकी

ढाका – भारत-अमेरिका-जपान-ऑस्ट्रेलिया यांच्या ‘क्वाड’मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यास बांगलादेशला फार मोठे नुकसान सहन करावे लागेल. यामुळे चीनचे बांगलादेशबरोबरील संबंध बिघडतील, अशी धमकी चीनने दिली आहे. चीनचा हा इशारा आक्रमक असल्याचा ठपका ठेवून ही दुर्दैवी बाब ठरते, असे बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी चीनला बजावले आहे.

बांगलादेशला, धमकी, क्वाड, राजदूत, इशारा, बांगलादेश, चीन, तिबेटबांगलादेशमधील चीनचे राजदूत ली जिमिंग यांनी क्वाडवरून बांगलादेशला इशारा दिला. क्वाडसारख्या गटामध्ये सहभागी होणे ही बांगलादेशसाठी चांगली बाब ठरणार नाही. कारण यामुळे चीनबरोबरील बांगलादेशचे द्विपक्षीय संबंध बिघडतील, असे राजदूत जिमिंग यांनी बजावले आहे. क्वाड आर्थिक व सुरक्षाविषयक संघटन असल्याचा दावा केला जात असला तरी ते खरे नाही. ही चीनच्या विरोधात करण्यात आलेली व्यूहरचना आहे, असा आरोप जिमिंग यांनी माध्यमांकडे केला. अशा गटात सहभागी होऊन बांगलादेशाच्या हाती काही पडणार नाही. उलट यामुळे बांगलादेशचे अधिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, असे जिमिंग पुढे म्हणाले.

याआधी २७ एप्रिल रोजी चीनचे संरक्षणमंत्री जनरल वुई फेंघे यांनी बांगलादेशचा दौरा केला होता. क्वाडवरून इशारा देण्यासाठीच त्यांनी बांगलादेशला भेट दिल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी बांगलादेशच्या पाठोपाठ श्रीलंकेचाही दौरा केला. त्यामागेही हेच कारण असल्याचा दावा केला जातो. मात्र या दोन्ही देशांकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे चीनने इशार्‍यांच्याही पुढे जाऊन धमक्या देण्याचे सत्र सुरू केल्याचे दिसते. चीनचे राजदूत ली जिमिंग यांची कठोर व आक्रमक भाषा याचीच साक्ष देत आहे.

मात्र चीनच्या धमकीचा आपल्यावर परिणाम होणार नाही, असे बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांनी नोंदविलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते. चीनची भाषा आक्रमक आहे आणि चीनच्या राजनैतिक अधिकार्‍यांकडून याआधी अशा भाषेचा वापर करण्यात आलेला नव्हता. ही बाब अतिशय दुर्दैवी ठरते आणि यामुळे बांगलादेश दुखावला गेला आहे, असे परराष्ट्रमंत्री डॉ. एके अब्दुल मोमेन यांनी म्हटले आहे.

याबरोबरच बांगलादेश स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे आणि आपले परराष्ट्र धोरण बांगलादेश स्वतःच निर्धारित करतो, असे परराष्ट्रमंत्री मोमेन यांनी चीनला खडसावले. तसेच बांगलादेशचे परराष्ट्र धोरण तटस्थ आणि समतोल राखणारे आहे, या धोरणाशी सुसंगत असणारे निर्णय घेण्यास आपला देश मोकळा असेल, असेही परराष्ट्रमंत्री मोमेन यांनी स्पष्ट केले. तर आत्तापर्यंत क्वाडमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव आमच्या समोर आलेलाच नाही, अशी माहिती बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयातील एका अधिकार्‍याने माध्यमांना दिली.

चीनला रोखण्यासाठीच क्वाडची स्थापना झाली, पण भारत, अमेरिका, जपान व ऑस्ट्रेलिया यांचा हा गट चीनचे काहीही वाकडे करू शकणार नाही, असे दावे चीनने ठोकले होते. मात्र गेल्या महिन्यात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पुढाकार?घेऊन क्वाडच्या व्हर्च्युअल परिषदेचे आयोजन केले. त्यानंतरच्या काळात क्वाडचा विस्तार करण्याची चर्चा सुरू झाली. क्वाड देशांच्या नौदलाबरोबर फ्रान्सच्या नौदलाचा संयुक्त युद्धसराव बंगालच्या उपसागरात पार पडला होता. फ्रान्स, ब्रिटन हे देश क्वाडमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच कॅनडा, दक्षिण कोरिया या देशांचाही समावेश क्वाडमध्ये केला जाऊ शकतो. बांगलादेशलाही क्वाडमध्ये सहभागी करण्याची चर्चा सुरू झाली होती.

सुरूवातीला क्वाडची खिल्ली उडविणारा चीन आता मात्र स्वतःला असुरक्षित मानू लागल्याचे दिसते. बांगलादेशला दिलेल्या धमकीमधून चीनची ही असुरक्षितता प्रकर्षाने जगासमोर येत आहे. अशारितीने धमक्या देऊन चीनने बांगलादेशला आपल्यापासून अधिकच दूर केल्याचे दिसत आहे. ही राजनैतिक पातळीवरील चूक चीनला अधिकच महाग पडू शकते. आधीच ब्रह्मपुत्रा नदीवर धरण उभारून चीनने भारतासह बांगलादेशच्या चिंता वाढविल्या आहेत. कारण तिबेटमध्ये उगम होणार्‍या या नदीचा प्रवाह भारत व त्यानंतर बांगलादेशमध्ये जातो. या नदीचे पाणी कमी झाले तर त्याचा फार मोठा फटका बांगलादेशलाही बसेल. म्हणूनच या धरणाचा चीन भारत व बांगलादेशच्या विरोधात शस्त्रासारखा वापर करू शकतो. म्हणूनच या प्रश्‍नावर भारत व बांगलादेशने सहकार्य वाढविले आहे.

leave a reply