तैवानच्या राष्ट्रीय दिनावरुन चीनची भारताला धमकी

नवी दिल्ली/बीजिंग – तैवानच्या राष्ट्रीय दिनाला भारतीयांनी दिलेला प्रतिसाद चीनला चांगलाच झोंबला आहे. राजधानी नवी दिल्ली येथील चिनी दूतावासाबाहेर तैवानच्या राष्ट्रीय दिनाची पोस्टर्स झळकवून चीनला चिथावणी दिल्याचा दावा चीनच्या सरकारी मुखपत्राने केला आहे. अशा बेताल वर्तनाद्वारे भारत आगीशी खेळ करीत आहे, अशी धमकी ग्लोबल टाईम्सने दिली आहे. त्यावर भारतातून प्रतिक्रिया आली असून हे पोस्टर्स लावणार्‍या नवी दिल्लीतील स्थानिक नेत्याने ही तर केवळ सुरुवात असल्याचे चीनला बजावले आहे. दरम्यान, तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई इंग-वेन यांनी तैवानचा राष्ट्रीय दिन साजरा करणार्‍या भारतीयांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहेत.

दोन दिवसांपूर्वी नवी दिल्लीतील चीनच्या दूतावासाने भारतीय माध्यमांसाठी निवेदन प्रसिद्ध केले होते. भारत सरकारने ‘वन चायना’ धोरणाला मान्यता दिली असून भारतीय माध्यमांनी देखील या धोरणाचे उल्लंघन करू नये, अशी मागणी चीनच्या दूतावासाने केली होती. चीनच्या दूतावासाचे हे निवेदन म्हणजे भारतीय माध्यमांना नाही तर सरकारला इशारा होता, याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले. यामुळे संतापलेल्या भारतीयांनी अधिकच उत्साहाने तैवानला राष्ट्रीय दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आमच्या देशात माध्यमे स्वतंत्र आहेत, असे सांगून चीनला प्रत्युत्तर दिले होते.

भारतातील काही आघाडीच्या माध्यमांनी चीनची पर्वा न करता तैवानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त विशेष जाहीराती प्रसिद्ध करुन चीनची मागणी धुडकावून लावली. तर सोशल मीडियावर भारतीयांनी तैवानच्या समर्थनार्थ मोठे कॅम्पेन चालवले होते. नवी दिल्लीतील एका स्थानिक नेत्याने शुक्रवार रात्रीपासूनच चिनी दूतावासासमोर दुतर्फा तैवानला राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा देणारे पोस्टर्स लावले व त्याचे फोटोग्राफ्स सोशल मीडियावर व्हायरल केले. थेट दूतावासासमोर तैवानच्या समर्थनार्थ पोस्टर्स लागल्यामुळे अस्वस्थ झालेल्या चीनच्या राजदूतांनी सदर पोस्टर्स काढून टाकण्याची मागणी केली होती. पुढच्या काही तासात चीनच्या कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र असलेल्या ‘ग्लोबल टाईम्स’ने भारताला धमकावले.

भारत आणि चीनमधील संबंध आधीच तणावग्रस्त असताना चीनच्या दूतावासासमोर तैवानच्या समर्थनार्थ असे शेकडो पोस्टर्स लावून सदर संबंध अधिकच संकटात टाकले आहेत, असा इशारा चिनी मुखपत्राने दिला. त्याचबरोबर चीनचे सामर्थ्य भारतापेक्षा अधिक असल्याचे सांगून भारताने आगीशी खेळ करू नये, अशी धमकी या मुखपत्राने दिली. कम्युनिस्ट पार्टीच्या मुखपत्राने दिलेल्या या धमकीला दिल्लीतील नेत्यानेच प्रत्युत्तर दिले. ‘‘गेल्या वर्षी चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर होते, तेव्हा ‘अतिथी देवो भव’ मानून आम्ही त्यांचे मोठे स्वागत केले होते. पण चीनने लडाखमध्ये आमच्या पाठीत खंजीर खुपसला, विश्वासघात केला. तुम्हीच आगीशी खेळणे सुरू केले आणि तुम्हीच संबंध बिघडवले आहेत. तुमच्या या विश्वासघाताची आम्ही फक्त व्याजासकट परतफेड सुरू केली आहे. यापुढेही आणखी प्रत्युत्तर मिळेल, प्रतिक्षेत करा’, असे जळजळीत प्रत्युत्तर सदर नेत्याने दिले.

तैवानच्या राष्ट्राध्यक्षा त्साई तसेच परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी भारतीयांनी दिलेल्या शुभेच्छांचा विशेष उल्लेख करुन आभार व्यक्त केले. त्याचबरोबर, भारत आणि तैवान स्वातंत्र्य व मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी आणि आपल्या लोकशाहीवादी जीवनशैलीचा बचाव करण्यासाठी एकत्र येऊ शकतो, अशी अपेक्षा तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केली आहे.

leave a reply