लडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच

- भारताचे परराष्ट्र सचिव श्रिंगला

नवी दिल्ली – ‘सीमेवर शांतता व सलोखा कायम असल्याखेरीज भारत आणि चीनचे संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत. एलएसीवर एकतर्फी कारवाई करून बदल घडविण्याचा प्रयत्न करणार्‍या चीनने भारताला चिथावणी दिली होती. अजूनही एलएसीवर काही ठिकाणी वाद सुटलेला नाही. त्यामुळे हा वाद सोडविण्याची जबाबदारी आता चीनची आहे’, असे भारताचे परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रिंगला म्हणाले. तर, आपण अधिक सामर्थ्यशाली देश आहोत, हे सिद्ध करण्यासाठी चीन लडाखच्या एलएसीवरील तणाव कायम ठेवील, असे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन यांनी बजावले आहे.

लडाखच्या एलएसीवरचा वाद सोडविण्याची जबाबदारी चीनचीच - भारताचे परराष्ट्र सचिव श्रिंगलाचीननेच घुसखोरी करून एलएसीवर एकतर्फी कारवाईद्वारे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करून पाहिला होता. असे प्रयत्न करून चीन भारताबरोबरील संबंध सुधारण्याची अपेक्षा ठेवू शकत नाही. त्याचवेळी अजूनही लडाखच्या एलएसीवरील काही भागांमधून चीनने आपले लष्कर माघारी घेतलेले नाही, याकडे परराष्ट्र सचिव हर्ष वर्धन श्रिंगला यांनी लक्ष वेधले. एका ऑनलाईन कॉन्फरन्समध्ये बोलताना परराष्ट्र सचिवांनी भारताबरोबरील संबंध सुधारण्याची जबाबदारी आता चीनची असल्याचे सांगून चीनने आपले लष्कर मागे घेतले नाहीत, तर संबंध सुधारणार नाहीत, असे संकेत दिले.

गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर चीनने केलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नांमुळेच भारताबरोबरील चीनचे संबंध बिघडले होते. चीनने इथून संपूर्ण माघार घेतल्याखेरीज संबंध सुरळीत होऊच शकत नाहीत, याची जाणीव श्रिंगला यांनी पुन्हा एकदा चीनला करून दिली. गेल्या काही आठवड्यांपासून चीन भारताला सीमावादाचा द्विपक्षीय सहकार्यावर परिणाम होऊ देऊ नका, असे आवाहन करीत आहे. सीमावाद कायम ठेवूनही दोन्ही देशांमधला व्यापार सहकार्य सुरू राहू शकते, असे चीनचे म्हणणे आहे. सीमावाद स्थानिक लष्करी अधिकार्‍यांवर सोडून त्यावर वरिष्ठ पातळीवरील अधिकार्‍यांनी चर्चा करण्याची आवश्यकता नाही, अशी भूमिका चीनने मांडली आहे.

सीमावादाचे अशारितीने स्थानिकीकरण करून चीन आपल्या घुसखोरीच्या प्रयत्नांची तीव्रता कमी करू पाहत आहे. पण भारताने चीनची ही मागणी स्पष्ट शब्दात धुडकावली. लडाखच्या एलएसीजवळील क्षेत्रातून चीनचे लष्कर गेल्या वर्षाच्या एप्रिल महिन्यात होते, त्याच स्थितीत मागे जावे, अशी ठाम भूमिका भारताने घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर, भारताचे माजी परराष्ट्र सचिव व ज्येष मुत्सद्दी श्याम सरन यांनी चीनबाबत सावध करणारा सल्ला दिला आहे.

गेल्या वर्षी लडाखच्या एलएसीवर चीनने केलेला घुसखोरीचा प्रयत्न वरिष्ठ नेतृत्त्वाच्या आदेशाखेरीज होणे शक्य नाही. याकडे स्थानिक पातळीवरील घटना म्हणून पाहण्याची चूक करू नका, ही जर स्थानिक पातळीवरील घुसखोरी असती, तर चीनच्या नेतृत्त्वाने नक्कीच हा वाद सोडविण्यासाठी पुढाकार घेतला असता, असे श्याम सरन यांनी म्हटले आहे.

चीनचे वर्चस्व सर्वच आशियाई देशांनी मान्य करावे, अथवा त्याचे परिणाम सहन करावे, असा संदेश चीन देऊ पाहत आहे. आपला देश अधिक सामर्थ्यशाली आहे, हे दाखवून देण्यासाठी चीन लडाखच्या एलएसीचा वाद चिघळवित ठेवील, याची जाणीव श्याम सरन यांनी भारताला करून दिली. चीनला टक्कर देण्याची क्षमता असलेला भारत हा एकमेव देश आहे आणि त्यासाठी भारताला देशांतर्गत पातळीवर व आंतरराष्ट्रीय पातळीवरही कठोर निर्णय घ्यावेच लागतील, असे सरन यांनी बजावले आहे.

leave a reply