दिवाळीत चीनला ४० हजार कोटी रुपयांचा फटका बसणार

नवी दिल्ली – यावर्षी दिवाळीत भारतीय बाजारपेठेत चीनचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान होण्याचा अंदाज आहे. भारतीय व्यापाऱ्यांनी चिनी मालाची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. गलवान व्हॅलीतील संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर चिनी मालावर बहिष्काराची मोहीम भारतीय व्यापारी संघटनांकडून चालवण्यात येत आहे. देशातील व्यापाऱ्यांची प्रमुख संघटना असलेल्या ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ (कॅट) कडून सुरू असलेल्या या मोहिमेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. जुलै महिन्यातही भारतीय व्यापाऱ्यांनी चायनीज राख्या खरेदी न केल्याने चीनचे ४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. आता चिनी व्यापाऱ्यांची दिवाळीही खराब जाणार आहे.

४० हजार कोटी

गेल्या काही वर्षांपासून देशात सणासुदीच्या काळात चिनी मालाची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. स्वस्त चिनी मालाची मागणी देशांतर्गत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर असल्याने हा माल व्यापाऱ्यांकडून आयात केला जातो. दरवर्षी भारतात दिवाळीच्या काळात ७० हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. यातील ४० हजार कोटी रुपयांचा माल हा चीनमधून आयात केला जातो. मात्र यावर्षी चीनकडून कोणताही माल आयात न करण्याचा निर्णय भारतीय व्यापाऱ्यांनी घेतला आहे.

देशातील व्यापाऱ्यांशी निगडीत ४० हजार छोट्या-मोठ्या संघटना आणि ६ कोटी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘कॅट’ ने यासाठी मोहीम चालवली आहे. ‘व्यापाऱ्यांनी चिनी माल खरेदी करु नये आणि भारतीय माल विकण्यास प्राधान्य द्यावे’ यासाठी कॅट व्यापाऱ्यांना प्रोत्साहित करत आहेत. व्यापारीही दिवाळीत भारतीय मालाची विक्री करण्यासाठी आवश्यक मालाचा साठा करत आहेत. दिवाळीत चीनमधून आयात होणारा माल काही महिने आधीपासून मागविला जातो. पण सध्या लडाखमध्ये भारत-चीनमध्ये असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या सामानाची आयात वेळेत झालेली नाही. त्यामुळे चीनला यावर्षी ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान उचलावे लागू शकते, असे स्पष्ट दिसून येत आहे.

४० हजार कोटी

यावर्षी भारतात ऑनलाईन खरेदीत वाढ झाली आहे. देशात ऑनलाईन खरेदीत ७० टक्के वाढ झाल्याचे एका अहवालातून समोर येत आहे. तसेच यावर्षी सरकारने ई -कॉमर्स धोरणही आणले असून ई -कॉमर्स कंपन्यांना विक्री करीत असेलेल्या सामानाच्या निर्मित देशाचा ठळक उल्लेख करणेही बंधनकारक केले आहे. या नियमांचे उल्लंघन करण्याऱ्या अमेझॉन आणि फ्लिपकार्टला नुकतीच केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने नोटीस पाठविल्याचे वृत्त आले होते. या नियमांमुळे ग्राहकांना ऑनलाईन विक्री केल्या जाणाऱ्या चिनी मालाची ओळख पटविणे शक्य होणार आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेत चीनला येत्या काळात मोठे नुकसान उचलावे लागू शकते, असा अंदाज आहे.

leave a reply