चीन वुहान लॅबसारख्या सातशे प्रयोगशाळा उभारणार

बीजिंग – चीनच्या ज्या वुहान लॅबमधून कोरोनाव्हायरसची निर्मिती झाली, तशा आणखीन सातशे प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा चीनने केली आहे. एकाच दिवसापूर्वी कोरोनाव्हायरस म्हणजे हिमनगाचे केवळ टोक असल्याचा इशारा वुहान लॅबमध्ये काम करणाऱ्या चिनी संशोधिकेने दिला होता. आता चीनच्या सरकारकडून चालविल्या जाणाऱ्या एका वर्तमानपत्राने, चीनची अमेरिकेबरोबरील स्पर्धा शिगेला पोहोचली असताना, या नव्या ७०० प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी घेतल्याचे म्हटले आहे. चीनमधून कोरोनापेक्षाही भयंकर साथींचा जगभरात फैलाव होऊ शकतो, अशी धमकीच चीनच्या या सरकारी मुखपत्राकडून दिली जात आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या नव्या सातशे प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय अमेरिकशी स्पर्धा करण्यासाठीच घेतल्याचा दावा, ‘इकोनॉमिक इंफॉर्मेशन डेलि’ या सरकारी वर्तमानपत्राने केला. येत्या वर्षाखेरीपर्यंत चीन या सातशे प्रयोगशाळा उभारल्या जातील. त्यातील काही प्रयोगशाळा वुहानमधील प्रयोगशाळेप्रमाणे वैद्यकीय संशोधनासाठी असतील. तर काही प्रयोगशाळांमध्ये तंत्रज्ञान विषयक संशोधन केले जाईल, असे या दैनिकाने स्पष्ट केले. अमेरिकेचे आव्हान स्वीकारुन चीनचा विकास घडवून आणणे हे या प्रयोगशाळांचे प्रमुख उद्दिष्ट असेल, असे या वर्तमानपत्राने पुढे म्हटले आहे. याआधी चीनमध्ये ५०१ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. मात्र, आता अमेरिकेशी स्पर्धा करण्यासाठी चीनला या नव्या प्रयोगशाळांची आवश्यकता भासत असल्याचे दिसत आहे.

चिनी कंपन्या अमेरिकेच्या बुद्धीसंपदा कायद्याचा भंग करीत असून अमेरिकन कंपन्यांच्या संशोधनाचा वापर करीत असल्याची तक्रार अमेरिका कित्येक वर्षापासून करीत आहे. यासंदर्भात अमेरिकन संसदेने ३३ चिनी कंपन्यांना ब्लॅक लिस्ट करण्याची कारवाई केली होती. अमेरिकेच्या या आरोपांना प्रत्युत्तर देऊन बुद्धीसंपदेचा आघाडीवर चीनला प्रबळ देश म्हणून उभे करणे, यासाठी नव्या सातशे प्रयोगशाळा काम करतील, असा खुलासा सदर चिनी वर्तमानपत्राने केला आहे. वरकरणी यात काही वावगे वाटत नसले तरी, या वर्तमानपत्राने वुहान प्रयोगशाळेचा केलेला उल्लेख निरीक्षकांचे लक्ष वेधून घेणारा ठरतो.

कोरोनाव्हायरसचा उगम झाला ती चीनची वुहान प्रयोगशाळा जगभरात कुख्यात बनली आहे. कोरोनाव्हायरसच्या प्रयोगशाळेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जगभरातील प्रमुख देश करीत आहेत. अशा जगभरात बदनाम झालेल्या या प्रयोगशाळेसारख्या आणखीन सातशे प्रयोगशाळा उभारणार असल्याचे सांगून चीन साऱ्या जगाला धमकावू पाहत आहे की काय, असा नवा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच चिनी संशोधिका शी झेंग्ली यांनी कोरोनाव्हायरस म्हणजे हिमनगाचे केवळ टोक असल्याचे सांगून जगाला याहूनही भयंकर साथींचा सामना करावा लागेल, असा इशारा दिला होता.

कोरोनाव्हायरसची साथ लपवून ठेवणाऱ्या चीनकडून जबर नुकसान भरपाई वसूल करण्याची मागणी जगभरातून होत असताना, चीन याहून भयंकर साथीचा इशारा देऊन आपल्या विरोधात जाणाऱ्या देशांना धमकावीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

leave a reply