भारत-तैवानमधील वाढत्या सहकार्याने चीन अस्वस्थ

बीजिंग/नवी दिल्ली – कोरोनाचा फैलाव व शेजारी देशांसह जगाच्या विविध भागांमध्ये सुरू असलेल्या विस्तारवादी कारवाया, यामुळे चीनविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावरील असंतोष वाढतो आहे. या वाढत्या नाराजीतून जगातील अनेक देश चीनविरोधात एकत्र येऊन व्यापक आघाडी विकसित करीत असून, परस्परांमधील सहकार्य वाढविण्यावर भर देत आहेत. गेल्या काही महिन्यात भारत व तैवानही जवळ येत असून त्यांच्यातील वाढत्या सहकार्याने चीन चांगलाच अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी भारत तैवानबरोबर व्यापारी चर्चा सुरू करणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावर चीनने नाराजी व्यक्त करताना, भारताने ‘वन चायना प्रिन्सिपल’ लक्षात ठेऊन तैवान मुद्यावर योग्य भूमिका घ्यावी, असे बजावले आहे.

चीन अस्वस्थ

जून महिन्यात गलवानमध्ये झालेल्या संघर्षानंतर भारत-चीन सीमेवर प्रचंड तणाव असून युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. त्याचवेळी तैवाननजिकच्या क्षेत्रातही चीनने मोठ्या प्रमाणात लष्करी तैनाती केली असून, सातत्याने हल्ल्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. चीनच्या या आक्रमक कारवायांच्या पार्श्वभूमीवर, भारत व तैवान या दोन्ही देशांनी चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून तैवान सरकारने नवे धोरण जाहीर केले असून, त्यात भारताला महत्त्वाचे स्थान असल्याची माहिती तैवानच्या नेत्यांनी दिली आहे. त्याचवेळी दुसऱ्या बाजूला भारताने तैवानच्या कंपन्यांचे स्वागत करण्याची भूमिका घेतली असून, व्यापारी चर्चेची तयारी सुरू केल्याचे संकेतही दिले आहेत. काही दिवसांपूर्वी तैवानच्या ‘नॅशनल डे’ला भारतातून जबरदस्त प्रतिसादही मिळाला होता.

चीन अस्वस्थएकामागोमाग घडणाऱ्या या घटनांनी चीन चांगलाच अस्वस्थ झाला असून, भारत व तैवानमधील जवळीक चांगलीच खटकत असल्याचे दिसत आहे. मंगळवारी चीनच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी, भारत-तैवान मुद्यावर बोलताना ‘वन चायना प्रिन्सिपल’ची आठवण करून देणे त्याचाच भाग दिसतो. ‘चीन एकच आहे आणि तैवान चीनचा अविभाज्य भाग आहे. कोणत्याही देशाने तैवानशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यास चीनचा स्पष्ट विरोध आहे. कोणत्याही देशाने तैवानशी अधिकृत व्यवहार सुरू करणे किंवा कोणत्याही स्वरूपाचा करार करणे, चीन खपवून घेणार नाही’, असे चीनचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी बजावले. ‘वन चायना प्रिन्सिपल’ आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्य केले असून, भारतही त्याचा भाग असल्याकडेही चीनच्या प्रवक्त्यांनी लक्ष वेधले. भारताने तैवानचा मुद्दा तारतम्य बाळगून योग्य रीतीने हाताळावा, असा सल्लाही लिजिअन यांनी दिला.

यावेळी, चीनने भारतातील तिबेटच्या ‘गव्हर्नमेंट इन एक्झाईल’चे प्रमुख व अमेरिकी दूतांमध्ये झालेल्या भेटीवरही टीका केली. ‘भारतातील तिबेटींचे सरकार ही विघटनवादी राजकीय संघटना असून तिबेटच्या स्वातंत्र्याच्या खोट्या स्वप्नामागे धावत आहे. चीनच्या घटनेविरोधात असलेल्या या गटाला कोणीही मान्यता दिलेली नाही. तिबेटसंदर्भातील घटना या चीनच्या अंतर्गत व्यवहाराचा भाग ठरतो’, असे चीनच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेने वरिष्ठ राजनैतिक अधिकारी रॉबर्ट डेस्ट्रो यांची तिबेटसाठी विशेष समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. त्यांनी नुकतीच भारतातील ‘गव्हर्नमेंट इन एक्झाईल’चे प्रमुख लॉब्संग संगे यांची भेट घेतली होती.

leave a reply