कोरोनाच्या उगमस्थानाचा तपास करणार्‍या डब्ल्यूएचओला अस्वस्थ झालेल्या चीनचा इशारा

बीजिंग – कोरोनाव्हायरसचा उगम चीनच्या वुहान लॅबमध्ये झाला, या मुद्यावर पुन्हा चौकशी करण्यास चीनने विरोध दर्शविण्यास सुरुवात केली आहे. हा मुद्दा राजकीय हेतूंनी वापरला जाण्याची शक्यता पुढे करून चीनने चौकशीला नकार देण्याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वीच, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) कोरोनाच्या उगमाचा तपास पुन्हा सुरू करण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी तज्ज्ञांच्या पथकाचीही घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनाच्या उगमस्थानाचा तपास करणार्‍या डब्ल्यूएचओला अस्वस्थ झालेल्या चीनचा इशारा‘आंतरराष्ट्रीय पातळीवर वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून कोरोनाचा शोध घेण्यास चीनचा पाठिंबा असून चीनही त्यात सहभागी होईल. मात्र कोरोनाच्या चौकशीच्या मुद्याचा राजकीय पातळीवर वापर करण्यास चीनचा ठाम विरोध आहे. डब्ल्यूएचओ, सल्लागार गट व सर्व संबंधितांनी वस्तुनिष्ठ व जबाबदार वैज्ञनिक दृष्टिकोन स्वीकारावा’, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजिअन यांनी बजावले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचा हा आक्रमक पवित्रा म्हणजे ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’कडून करण्यात येणार्‍या तपासाला विरोध दर्शविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येते.

‘डब्ल्यूएचओ’च्या पथकाने जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात चीनच्या वुहानला भेट दिली होती. त्यानंतर मार्च महिन्याच्या अखेरीस अहवाल सादर करण्यात आला होता. या अहवालात ‘वुहान लॅब’चा संबंध नाकारण्यात आला होता. त्यावेळी ‘डब्ल्यूएचओ’चे प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनीही त्याचे समर्थन केले होते. या अहवालापूर्वीही त्यांनी सातत्याने चीनची बाजू घेतल्याचे समोर आले होते. यावरून ‘डब्ल्यूएचओ’वर टीकेची प्रचंड झोड उठली होती. या संघटनेने चीनचे बाहुले म्हणून काम करून अहवाल दिल्याची टीका आरोग्य तसेच संशोधन क्षेत्रातून सुरू झाली होती.

त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरण बदलण्यास सुरुवात झाली. अमेरिका व युरोपिय देशांसह जगातील प्रमुख देशांनी कोरोनाव्हायरसचा उगम चीनमधूनच झाल्याचे आरोप करण्यास सुरुवात केली. अमेरिकेच्या अनेक वरिष्ठ नेते, अधिकारी तसेच संशोधकांनी वुहान प्रयोगशाळेकडेच बोट दाखविले. चीनमधून बाहेर पडलेल्या एका संशोधिकेनेही आपल्याकडे यासंदर्भात पुरावे असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी अमेरिकी यंत्रणांना ‘वुहान लॅब लीक’ची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘वुहान लॅब लीक थिअरी’चा मुद्दा ऐरणीवर आला.कोरोनाच्या उगमस्थानाचा तपास करणार्‍या डब्ल्यूएचओला अस्वस्थ झालेल्या चीनचा इशारा

या दडपणानंतर जुलै महिन्यात, ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चे (डब्ल्यूएचओ) प्रमुख टेड्रॉस घेब्रेस्यूस यांनीच चीनने पुन्हा एकदा विस्ताराने चौकशी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. चीनने अधिक पारदर्शकता व खुलेपणा पाळून साथीच्या सुरुवातीच्या काळातील ‘रॉ डेटा’ संघटनेकडे द्यावा, असेही संघटनेकडून सांगण्यात आले. त्यापाठोपाठ ‘वुहान लॅब थिअरी’ पूर्णपणे नाकारता येणार नाही व नव्याने तपास होऊ शकतो, असे संकेतही देण्यात आले.

मात्र चीनकडून त्याला सातत्याने विरोध करण्यात येत आहे. काही देश कोरोनाच्या उगमाच्या मुद्याबाबत राजकारण करण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि चीनला या गोष्टीची चिंता वाटते’, अशा शब्दात चीनने पहिली मागणी फेटाळली होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात चीनच्या मंत्र्यांनी, आधीचा अहवाल रद्द करण्यास चीनचा विरोध आहे, असे सांगून नव्या चौकशीला विरोध दर्शविला होता. आता तपासासाठी नव्या पथकाची घोषणा झाल्यावर पुन्हा राजकीय हेतूंचे कारण पुढे करीत चीनने नकारघंटा वाजविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या उगमाबाबत सारे काही आलबेल नसल्याच्या संशयाला अधिकच बळ मिळत असल्याचे दिसत आहे.

leave a reply