मध्य आशियाई देशांमध्ये चीन आपल्या ‘प्रायव्हेट आर्मी’चा विस्तार करणार

‘प्रायव्हेट आर्मी’वॉशिंग्टन – अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैन्यमाघारीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी चीनने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. अफगाणिस्तानात वर्चस्व प्रस्थापित करून त्याद्वारे मध्य आशियाई देशांमध्ये प्रभाव टाकण्यासाठी चीनने महत्त्वाचा निर्णय घेतला. मध्य आशियाई देशांमध्ये चीन आपल्या ‘प्रायव्हेट आर्मी’चा अर्थात कंत्राटी लष्कराचा विस्तार करणार आहे.

गेल्या आठवड्यात मध्य आशियाई देशांच्या दौर्‍यावर असणार्‍या चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी ही घोषणा केली. मध्य आशियाई देशांमध्ये चीन करीत असलेला खाजगी लष्कराचा विस्तार रशियाच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरेल, असा दावा प्रसिद्ध अमेरिकी अभ्यासगटाने केला आहे.

अफगाणिस्तानातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी गेल्या आठवड्यात ताजिकिस्तान व उझबेकिस्तानमध्ये विशेष बैठकींचे आयोजन केले होते. यानिमित्ताने चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांनी ताजिकिस्तान, उझबेकिस्तान यांच्यासह तुर्कमेनिस्तान यांचा दौरा केला होता. या दौर्‍यात चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मध्य आशियाई देशांसमोर खाजगी लष्करी कंपनी अर्थात प्रायव्हेट मिलिटरी कंपनीज्’चा (पीएमसी) विस्तार करण्याचे जाहीर केले.

गेली काही वर्षे आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह-बीआरआय’ प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी चीनने मध्य आशियाई देशांमध्ये ‘पीएमसी’ उभारल्या आहेत. या कंपन्यांचा विस्तार अर्थात मध्य आशियाई देशांमधील चीनच्या खाजगी जवान अर्थात कंत्राटी जवानांची संख्या वाढविण्याची घोषणा वँग ई यांनी केली. यामुळे दहशतवादी हल्ल्यांपासून ‘बीआरआय’ प्रकल्पाची सुरक्षा होईल आणि संबंधित देशांवर प्रकल्पाच्या सुरक्षेचा बोजा पडणार नाही असा खुलासा चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिला आहे. त्याचबरोबर हे खाजगी जवान मध्य आशियाई देशांच्या लष्कराच्या नेतृत्वाला प्रशिक्षणही पुरवतील, असे वँग ई यांनी म्हटले आहे.

‘प्रायव्हेट आर्मी’आशियाई देशांना आखात, युरोपशी जोडणार्‍या या ‘बीआरआय’ प्रकल्पामध्ये चीनने अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा दावा केला जातो. यापैकी युरोपला जोडणारा बीआरआयचा महत्त्वाचा मार्ग मध्य आशियाई देशांमधून जातो. यापैकी किरगिझिस्तानात बीआरआय प्रकल्पाला कडाडून विरोध होत आहे. इतर मध्य आशियाई देशांमध्येही बीआरआय विरोधात नाराजी वाढू लागल्याचा दावा केला जातो. यामुळे धोका वाढल्याने आपल्या प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी चीन मध्य आशियाई देशांमध्ये खाजगी जवानांची तैनाती वाढवित आहे.

मध्य आशियाई देशांमधील चीनच्या खाजगी जवानांची वाढती तैनाती अमेरिका, रशिया तसेच तुर्कीला आव्हान देणारी असल्याचा दावा ‘द जेम्सटाऊन’ या अमेरिकी अभ्यासगटाने केला. एकेकाळी सोव्हिएत रशियाचा भाग असलेल्या या मध्य आशियाई देशांमधील चीनची तैनाती रशियाच्या चिंता वाढविणारी ठरेल, असे अमेरिकी अभ्यासगटाचे म्हणणे आहे. किरगिझिस्तान आणि ताजिकिस्तान या दोन्ही देशांमधील सरकारे दुबळी असून या देशांची अर्थव्यवस्था खालावलेली आहे. अशा परिस्थितीत, चीनचे खाजगी लष्कर या देशांच्या अंतर्गत आणि परराष्ट्र धोरणांवर जबरदस्त प्रभाव टाकेल, असा इशारा अमेरिकी अभ्यासगटाने दिला आहे. आत्तापर्यंत आपल्या प्रभावाखाली असणार्‍या या देशांवरील चीनचे वर्चस्व रशियाच्या सुरक्षेसाठी घातक ठरेल, असे अमेरिकी अभ्यासगटाचे बजावले आहे.

leave a reply