आपल्याला धक्का देणार्‍या क्वाडच्या सदस्य देशांना चीन शिक्षा करील

- चीनच्या सरकारी मुखपत्राची धमकी

बीजिंग – ‘क्वाड आणि ऑकस हे चीनला घेरण्यासाठी तयार केलेले भयंकर गट आहेत. अमेरिकेच्या नादी लागून भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाने या गटात स्वतःला गुंतवून घेऊ नये. कारण या गटाने मर्यादारेषा ओलांडली, तर चीन आपल्या हितसंबंधांना धक्के देणार्‍या कुणाचीही पर्वा न करता जबर शिक्षा करील’, अशी नवी धमकी चीनने दिली आहे. नेहमीप्रमाणे ग्लोबल टाईम्स या आपल्या सरकारी मुखपत्रामार्फत चीनने क्वाड व ऑकसच्या विरोधात ही धमकी दिली. आधीच्या काळात क्वाडची खिल्ली उडवून हे सहकार्य कधीही प्रत्यक्षात उतरणार नाही, असे दावे ग्लोबल टाईम्सनेच ठोकले होते. पण आता मात्र चीन त्याकडे धोकादायक म्हणून पाहू लागल्याचे ग्लोबल टाईम्सच्या धमकीतून उघड होत आहे.

आपल्याला धक्का देणार्‍या क्वाडच्या सदस्य देशांना चीन शिक्षा करील - चीनच्या सरकारी मुखपत्राची धमकीसंयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल झाले आहेत. अमेरिकेतील भारतीयांनी पंतप्रधान मोदी यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. अमेरिकन उद्योगक्षेत्राबरोबरील पंतप्रधान मोदी यांची चर्चा हा आंतरराष्ट्रीय माध्यमांच्याही औत्सुक्याचा विषय बनला आहे. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याबरोबरील पंतप्रधान मोदी यांच्या चर्चेकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. अफगाणिस्तानातील उलथापालथी व इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील परिस्थिती हे पंतप्रधान मोदी व राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्यातील द्विपक्षीय चर्चेतील अत्यंत महत्वाचे मुद्दे असतील. त्यानंतर क्वाडची बैठक पार पडेल.

या बैठकीच्या आधी जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी चीनबाबत सार्‍या जगाला सावध करणारा इशारा दिला होता. ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील चीनच्या उदयामुळे असमतोल निर्माण झाला आहे. त्यात कोरोनाच्या साथीमुळे आलेल्या अनिश्‍चिततेची भर पडलेली आहे. अशा काळात चीनचे वाढते लष्करी सामर्थ्य जपानच्या सुरक्षेसाठी धोकादायक बनू शकते’, असे पंतप्रधान सुगा यांनी बजावले होते. ग्लोबल टाईम्समधील लेखात याचा उल्लेख करून जपानसारखा देश अकारण चीनच्या लष्करी सामर्थ्याचा बागुलबुवा उभा करीत असल्याची टीका केली. चीन आपल्या जीडीपीच्या दीड टक्क्याहून कमी रक्कम संरक्षणावर खर्च करीत आहे, असे सांगून ग्लोबल टाईम्सने चीनपासून कुणालाही धोका संभवत नाही, असा दावा केला.

इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील वाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून क्वाडची आवश्यकता असल्याचे सांगितले जाते. पण हा अपप्रचार ठरतो कारण चीनने कधीही वाहतुकीच्या स्वातंत्र्याला आव्हान दिलेले नाही. तसेच जागतिक उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा साखळीबाबत क्वाडच्या सदस्यदेशांकडून केली जाणारी विधाने बेजबाबदार ठरतात, अशी टीका ग्लोबल टाईम्सने केली. केवळ चीनला लक्ष्य करण्यासाठी क्वाड व ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि अमेरिकेचे ऑकस संघटन उभे करण्यात आले आहे. पण हे देश चीनला कशारितीने घेरणार ते अजूनही स्पष्ट झालेले नाही. सध्या तरी चीनला लक्ष्य करण्याची या देशांची योजना हवेतच असल्याचे शेरे या चिनी मुखपत्राने मारले आहेत.

क्वाड आणि ऑकसमध्ये इतर देशांनी सहभागी व्हावे, यासाठी प्रयत्न केले जातील. पण कुठल्याही देशाने त्याला बळी पडता कामा नये. भारत, जपान व ऑस्ट्रेलियानेही अमेरिकेच्या नादी लागून वाहवत जाऊ नये. कारण एका मर्यादेच्या बाहेर जाऊन या देशांनी चीनचे हितसंबंध धोक्यात आणले आणि मर्यादारेषा ओलांडली, तर चीन या देशांना त्याची शिक्षा केल्यावाचून राहणार नाही. तसे करताना कुठल्याही देशाबरोबरील आपल्या संबंधांची पर्वा चीन करणार नाही, असा इशारा चीनच्या या सरकारी मुखपत्राने दिला.

दरम्यान, आधीच्या काळात क्वाडची खिल्ली उडवून ही चीनविरोधी योजना कधीही प्रत्यक्षात येणार नाही, असे दावे चीनने ग्लोबल टाईम्समार्फत केले होते. पण चीन क्वाड व ऑकसकडेही आता अतिशय गंभीरपणे पाहू लागला आहे. जगभरातील विश्‍लेषक चीन क्वाडमुळे धास्तावल्याचे मान्य करीत आहेत. इतकेच नाही तर क्वाडमध्ये सहभागी झाल्यास त्याचे भयंकर परिणाम होतील, अशा धमक्या चीनने बांगलादेशला दिल्या होत्या. आग्नेय आशियातील छोटे देश देखील क्वाडशी सहकार्य करतील, अशी चिंता चीनला भेडसावत आहे. म्हणूनच चीन वारंवार याविरोधात इशारे देऊन आपली असुरक्षितता दाखवून देत आहे.

leave a reply