तैवानवरून चीनची भारतीय माध्यमांवर आगपाखड

नवी दिल्ली – तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी एका भारतीय वृत्तवहिनीला दिलेली मुलाखत चीनला चांगलीच झोंबली आहे. नवी दिल्लीतील चीनच्या दूतावासाने याचा निषेध करुन भारतीय माध्यमांना पुन्हा एकवार ‘वन चायना पॉलिसी’ची आठवण करुन दिली आहे. याआधीही चीनने तैवानचा स्वतंत्र देश असा उल्लेख करणाऱ्या आणि तैवानचा राष्ट्रीय दिनाच्या जाहिराती प्रसिद्ध करणाऱ्या भारतीय माध्यमांवर चीनने आगपाखड केली होती. याला तैवाननेही जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

आगपाखड

गुरुवारी तैवानचे परराष्ट्रमंत्री जोसेफ वू यांनी एका भारतीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चीनच्या विस्तारवादी धोरणावर सडकून टीका केली. ‘ईस्ट चायना सी’ पासून ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रापर्यंत चीन अरेरावी करीत आहे. पण चीनच्या अरेरावीला या क्षेत्रातले देश प्रत्युत्तर देत असल्याचे तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ठणकावून सांगितले. भारत चीनच्या सीमावादावरही तैवान लक्ष ठेवून असल्याचे तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटले. चीनविरोधात भारताच्या आक्रमक भूमिकेचेही तैवानच्या परराष्ट्र मंत्रालयाने समर्थन केले.

अमेरिका आणि जपानसोबत तैवानचे पारंपरिक संबंध आहेत. तैवान भारताशी सहकार्य वाढविण्यास उत्सुक आहे. भारत आणि तैवानने गोपनीय माहितींचे आदानप्रदान करायला हवे, असे मत तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मांडले. तसेच चीनच्या विरोधात पर्यायी ‘पुरवठा साखळी’ उभारणे गरजेचे असल्याचे जोसेफ वू यांनी म्हटले.

तैवानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या या मुलाखतीनंतर काही तासातच चीनकडून प्रतिक्रिया आली आहे. भारतीय माध्यमाने चीनच्या ‘वन चायना पॉलिसी’चे उल्लंघन केले आहे. यातून भारतीय जनतेला चुकीचा संदेश जात असल्याचा दावा चीनच्या दूतावासाने केला. याआधीही चीनच्या दूतावासाने तैवानचा राष्ट्रीय दिन साजरा करणाऱ्या भारतीय माध्यमांना धमकावले होते. पण चीनच्या धमकीला न झुगारता माध्यमांनी तैवानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. तसेच दिल्लीतल्या चीनच्या दूतावासाबाहेर तैवानला राष्ट्रीय दिनानिमित्त शुभेच्छा देणारे पोस्टर्स लागले होते. यानंतर चीनच्या सरकारी मुखपत्राने भारताने आगीशी खेळू नये, असा इशारा दिला होता.
पण या इशाऱ्याचा भारत-तैवानच्या संबंधावर परिणाम झाला नाही. तैवानचा राष्ट्रीय दिन साजरा करणाऱ्या भारतीयांप्रती तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनी कृतज्ञता व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसातल्या तैवानच्या राष्ट्राध्यक्षांच्या सोशल मीडियावरच्या भारतासंदर्भातल्या पोस्ट लक्षवेधी ठरल्या आहेत.

leave a reply