भारतावर चीनच्या दडपणाचा परिणाम होणार नाही

- संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांचा इशारा

नवी दिल्ली – आपले लष्कर उत्कृष्ट दर्जाचे आहे, आपल्याकडे घातक तंत्रज्ञान आहे. याचा वापर करून भारताला धक्का देता येईल व भारत सहजतेने माघार घेईल, असा गैरसमज चीनने करून घेतला होता. मात्र आपल्या उत्तरेकडील सीमेवर भारत ठामपणे उभा राहिला आणि इथे एकतर्फी बदल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. धक्का देऊन आपल्याला मागे ढकलले जाऊ शकत नाही, हे भारताने दाखवून दिले आहे. चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्यात भारताला यश मिळत आहे, असे सांगून भारताचे संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी देशाची भूमिका खणखणीतपणे मांडली.

नवी दिल्लीत सुरू असलेल्या ‘रायसेना डायलॉग’ या सुरक्षाविषयक परिषदेला संबोधित करताना संरक्षणदलप्रमुखांनी लडाखच्या एलएसीवरील घडामोडींवर नेमक्या शब्दात भाष्य केले. आपल्याकडे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि त्याचा वापर करून आपण भारताला मागे रेटू शकतो, असे चीनला वाटत होते. पण ते या देशाला साध्य करता आले नाही, कारण भारत हा दडपणाखाली झुकणारा देश नाही, असे सांगून संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी चीनला चांगलेच खडसावले. लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनमध्ये चर्चेची ११ वी फेरी नुकतीच पार पडली. या चर्चेत चीनने भारताची मागणी अमान्य करून लडाखच्या एलएसीवरील गोग्रा, हॉट स्प्रिंग आणि डेप्सांग इथून लष्कर मागे घेण्यास नकार दिला होता.

यानंतर भारताने थेट शब्दात चीनला परिणामांची जाणीव करून देण्याचा सपाटा लावला आहे. जनरल रावत यांनी रायसेना डायलॉगमध्ये चीनच्या आक्रमकतेचा भारताच्या निर्धावर परिणाम होणार नाही, याची स्पष्टपणे जाणीव करून दिली. भारताला धक्का देऊन मागे ढकलता येईल, या भ्रमात चीनला राहता येणार नाही. त्याचवेळी आपल्याकडील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारतावर दडपण वाढविण्याचे चीनचे प्रयत्न यशस्वी ठरणार नाहीत, याची परखड शब्दात जनरल रावत यांनी जाणीव करून दिली. याच्या बरोबरीने जनरल रावत यांनी भारताला मिळणार्‍या आंतरराष्ट्रीय समर्थनात वाढ झालेली आहे, याकडेही संरक्षणदलप्रमुखांनी लक्ष वेधले.

दरम्यान, आपले लष्कर सर्वात सामर्थ्यशाली आहे, हा चीनचा दावा भारताने खोटा ठरविल्याचे जनरल रावत सांगत आहेत. आपल्याकडे अजेय लष्कर असून दुसर्‍या देशांचा या बलाढ्य लष्करासमोर निभाव लागणे शक्यच नाही, अशा धमक्या चीन सातत्याने देत आला आहे. काही दिवसांपूर्वी तैवानाही चीनने अशीच धमकी दिली होती. पण लडाखच्या एलएसीवर भारतासमोर चीनच्या लष्कराचे काहीच चालले नाही. उलट चीनच्या लष्कराची कमकुवत बाजू यामुळे जगजाहीर झाली आणि त्याचवेळी भारतीय लष्कराची क्षमता आणि निर्धार यांचा परिचय सार्‍या जगाला झाला. जनरल रावत यांच्या विधानातून हे सारे संकेत दिले जात आहेत.

दरम्यान, संरक्षणदलप्रमुख जनरल रावत यांनी रायसेना डायलॉगच्या पार्श्‍वभूमीवर, जपानच्या संरक्षणदलांचे प्रमुख जनरल कोजी यामाझाकी यांच्याशी चर्चा केली. चीन आपल्या बळाचा वापर करून एकतर्फी बदल घडवून आणण्याच्या तयारीत आहे. अशा काळात समविचारी देशांनी एकत्र येणे अत्यावश्यक बनले आहे, असे जपानचे जनरल कोजी यामाझाकी यावेळी म्हणाले. तसेच ऑस्ट्रेलियाचे लष्करप्रमुख जनरल अँगुस कॅम्बेल यांच्याशीह जनरल रावत यांची चर्चा पार पडली आहे.

leave a reply