रायसेना डायलॉगमध्ये झालेल्या टीकेवर चीनच्या दूतावासाचा आक्षेप

नवी दिल्ली – झिजिंयांग, हॉंगकॉंग आणि तैवानचा मुद्दा उपस्थित करून अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ऍडमिरल फिल डेव्हिडसन यांनी केलेली टीका चीनला चांगलीच झोबली आहे. नवी दिल्लीतील ‘रायसेना डायलॉग’ या भारताच्या सुरक्षाविषयक परिषदेत बोलताना ऍडमिरल डेव्हिडसन यांनी या मुद्यांवर चीनला धारेवर धरले होते. यावर आक्षेप घेऊन नवी दिल्लीतील चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी त्याचा निषेध केला आहे. चीनच्या अंतर्गत कारभारावरील शेरेबाजी आम्ही खपवून घेणार नाही, असे चिनी दूतावासाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

रायसेना डायलॉगमध्ये इंडो-पॅसिफिक क्षेत्राची सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. या परिषदेत जपान, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा समावेश चीनला खटकत आहे. फ्रान्स व ऑस्ट्रेलियासारख्या देशांच्या नेत्यांनी या परिषदेत व्हर्चुअल माध्यमातून उपस्थित राहून आपला नामोल्लेख टाळून केलेली टीका सहन करणे चीनसाठी अवघड बनले आहे. त्याचवेळी भारताच्या संरक्षणदलप्रमुखांनी लडाखच्या एलएसीवरील घटनांवरून दिलेला सज्जड इशारा देखील चीनला अस्वस्थ करणारा ठरत आहे.

अशा परिस्थितीत चीनच्या दूतावासाने केवळ अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक कमांडचे प्रमुख ऍडमिरल फिल डेव्हिडसन यांनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली. तैवानच्या हवाई हद्दीत चीन सातत्याने घुसखोरी करीत असून आपण कुठल्याही क्षणी तैवान ताब्यात घेऊ शकतो, असे संदेश चीनकडून दिले जात आहेत. त्याचवेळी हॉंगकॉंगमधील लोकशाहीवादी निदर्शकांची गळचेपी करण्यासाठी चीनकडून निर्दयतेने कारवाई केली आहे. तर झिंजियांग प्रांतातील उघूरवंशिय इस्लामधर्मियांवर चीनकडून अनन्वित अत्याचार केले जात आहे. उघूरवंशियांच्या मानवाधिकारांचे हनन हा आता आंतरराष्ट्रीय मुद्दा बनत चालला आहे.

ऍडमिरल फिल डेव्हिडसन यांच्या रायसेना डायलॉगमधील चर्चेत झिजिंयांग, हॉंगकॉंग आणि तैवान हे मुद्दे उपस्थित करून चीनला धारेवर धरले होते. चीनच्या कारवाया घातक पातळीपर्यंत पोहचल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे, असे सांगून चीनच्या धोक्याकडे ऍडमिरल डेव्हिडसन यांनी लक्ष वेधले. यावर चीनच्या नवी दिल्लीतील दूतावासाचे प्रवक्ते वँग शिओजियान यांनी आक्षेप नोंदविला. झिजिंयांग, हॉंगकॉंग आणि तैवान हे सारे मुद्दे म्हणजे चीनची अंतर्गत बाब ठरते. आपल्या अंतर्गत बाबींवर इतर देशांनी केलेली बेजबाबदार टीका चीन कधीही खपवून घेणार नाही, आम्ही त्याला विरोधच करू, असे शिओजियान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, लडाखच्या एलएसीवर भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा प्रभाव यावर्षीच्या रायसेना डायलॉगवर पडल्याचे दिसत आहे. यात सहभागी झालेले नेते, राजनैतिक अधिकारी व लष्करी अधिकारी इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे महत्त्व आणि या क्षेत्राला असलेला धोका सातत्याने अधोरेखित करीत आहेत. या क्षेत्राला चीनच्या वर्चस्ववादी धोरणांपासून गंभीर धोका संभवतो, यावर सर्वांचे एकमत झाले आहे. त्याचवेळी इंडो-पॅसिफिक क्षेत्राचे स्थैर्य, सुरक्षा व समृद्धी यासाठी भारत फार मोठे योगदान देऊ शकतो, यावरही एकमत असल्याचे रायसेना डायलॉगमध्ये स्पष्ट झाले आहे.

leave a reply