पाकिस्तान ‘पीओके’मधून लष्कर मागे घेईपर्यंत संघर्ष कायम राहील

- गिलगिट बाल्टिस्तानचे नेते सज्जाद यांचा इशारा

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या लष्कर ‘पीओके’मधून निघून जात नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहील, असा इशारा गिलगिट बाल्टिस्तानचे नेते आणि मानवाधिकार कार्यकर्ते सज्जाद राजा यांनी दिला. पंतप्रधान इम्रान खान यांनी ‘गिलगिट बाल्टिस्तान’ला पाचवा प्रांत घोषित करण्याच्या हालचाली सुरु केल्यानंतर ‘पीओके’च्या जनतेमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे. पाकिस्तानच्या या निर्णयाविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. तसेच पाकिस्तानबाहेर राजकीय आश्रय घेऊन राहणारे ‘पीओके’मधील कार्यकर्ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानचा क्रूर चेहरा जगासमोर आणत आहेत.

संघर्ष

“पाकिस्तानच्या लष्कराने ‘पीओके‘ वर अवैधरीत्या कब्जा मिळविला आहे. २२ ऑक्टोबर १९४७ रोजी जम्मू-काश्मीरवर आक्रमण केले होते आणि या भागाचे विभाजन केले. ”, अशा शब्दात ‘पीओके’चे कार्यकर्ते सज्जाद राजा यांनी पाकिस्तानला त्यांनी हा भाग बळकावलेला आहे, याची आठवण करून दिली. त्याचवेळी जोपर्यंत पाकिस्तान येथून आपले लष्कर मागे घेत नाही, तोपर्यंत पाकिस्तानविरोधात संघर्ष सुरु राहील, असे सज्जाद यांनी ठणकावून सांगितले. तसेच यावर्षी २२ ऑक्टोबर दिवस ”प्रतिकार दिन” म्हणून साजरा केला जाईल, असे राजा म्हणाले.

काही दिवसांपूर्वी ‘युरोपियन फाऊंडेशन फॉर साऊथ एशियन स्टडीज’ने २२ ऑक्टोबर हा दिवस जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील ‘काळा दिवस’ असल्याचे म्हटले होते. तीन आठवड्यांपूर्वीच सज्जाद यांनी संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानच्या इम्रान खान यांचे सरकार ‘पीओके’च्या नागरिकांना जनावरांसारखे वागवित असल्याचा आरोप केला होता. पाकिस्तानचे लष्कर दिवसाढवळ्या ‘पीओके’च्या नागरिकांची हत्या करीत आहेत. निदान आतातरी संयुक्त राष्ट्रसंघाने याकडे लक्ष द्यावे, असे कळकळीचे आवाहन सज्जाद यांनी यावेळी केले होते.

नुकतेच “पीओके’च्या माजी पंतप्रधानांनी देखील ‘गिलगिट-बाल्टिस्तान’ पाकिस्तानचा नाही तर तो काश्मीरचा भूभाग आहे”, असे ठणकावून सांगितले होते. आता ‘पीओके’चे नेते सज्जाद राजा यांनी पाकिस्तानच्या लष्कराला येथून चालते होण्याचा इशारा दिला आहे.

leave a reply