भारतातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १९ लाखांवर

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या रूग्णांची संख्या १९ लाखांवर पोहोचली आहे, तर कोरोनामुळे दगावलेल्या रूग्णांची संख्या ३९ हजारांवर गेली आहे. भारतात सलग सातव्या दिवशी कोरोनाचे ५० हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळले आहेत. मात्र एका बाजूला रुग्णसंख्या वाढत असतानाच आतापर्यंत १२ लाख रूग्ण या आजारातून बरे झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

१९ लाखांवर

मंगळवारी महाराष्ट्रात ७,७६० नव्या रूग्णांची नोंद झाली, तसेच ३०० जण या साथीने दगावले. महाराष्ट्रातील कोरोनाच्या रुग्णसंख्येपैकी एक चतुर्थांश रूग्ण मुंबईत असल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. पुण्यातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून आली. दिवसभरात पुण्यात कोरोनाचे २ हजार रूग्ण आढळले असून ४५ रूग्ण दगावले आहेत. राज्यात आतापर्यंत ४ लाख ५७ हजार ९५६ रूग्ण कोरोना रूग्ण आढळले आहेत आणि या साथींच्या बळींची संख्या १६,१४२ वर गेली आहे.

महाराष्ट्रानंतर आंध्रप्रदेशात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आंध्र प्रदेशात एका दिवसात ९,७४७ रूग्ण आढळले तर ६७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूत चोवीस तासात १०० जणांचा या साथीने बळी गेला कोरोनाचे ५,०६३ नवे रूग्ण सापडले. कर्नाटकात एका दिवसात ६,२५९ नव्या रूग्णांची भर पडली तर ११० रूग्ण या साथीमुळे दगावले आहेत. परिणामी या राज्यातील कोरोनामुळे बळी जाणाऱ्यांची संख्या २,७०४ वर पोहोचली आहे तर आतापर्यँत १,४५,८३० रूग्णांची नोंद करण्यात झाली आहे.

दरम्यान राजधानी नवी दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मिझोरम, त्रिपुरा आणि उत्तराखंड राज्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. देशात आतापर्यंत दोन कोटीहून अधिक चाचण्या झाल्या असून सोमवारी चोवीस तासात ६.६ लाख चाचण्या घेण्यात आल्याची माहिती, आरोग्यमंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली. देशात मृत्युदर कमी होत आहे. तसेच देशातील ८२ टक्के कोरोनाव्हायरसचे रुग्ण १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये आहेत. तर देशामध्ये कोरोनाव्हायरसने बळी गेलेल्यांमध्ये ५० टक्के ६० वर्षांवरील रुग्ण असल्याचे भूषण यांनी सांगितले. देशात सक्रिय रुग्णांपेक्षा बरे झालेल्या व्यक्तींची संख्या दुप्पट आहे. देशात बारा लाख रुग्ण बरे झाले असून पाच लाख जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती भूषण यांनी दिली.

leave a reply