देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २४ लाखांनजीक – महाराष्ट्रात चोवीस तासात १२,७१२ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली/मुंबई – ”देशासाठी हा परीक्षेचा काळ असून अद्याप देशात कोरोनाच्या रुग्ण संख्येने शिखर गाठलेले नाही, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. देशात दरदिवशी ५० ते ६० हजार नवे रुग्ण आढळत असताना या साथीच्या फैलावाकडे देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कोअर टीमचा सदस्य असलेल्या डॉ.गुलेरिया यांचा हा दावा चिंता वाढविणारा ठरतो. मंगळवारी देशात सुमारे ६१ हजार नवे रुग्ण आढळले नव्हते, तर बुधवारी सुमारे तितक्याच नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील या साथीच्या नव्या रुग्णांची संख्या २४ लाखांजवळ पोहोचली आहे.

बुधवारी महाराष्ट्रात ३४४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आणि १२७१२ नवे रुग्ण आढळले. यामुळे राज्यात आतापर्यंत नोंद झालेल्या एकूण रुग्णांची संख्या साडे पाच लाखांवर पोहोचली आहे. मुंबईत ११३२ आणि पुण्यात १६६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. आंध्रप्रदेशात ९३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, तर ९५९७ नवे रुग्ण आढळले. तामिळनाडूत चोवीस तासात ११९ जण दगावले आणि ५८७१ नवे रुग्ण आढळले. कर्नाटकात ११३ जणांचा एका दिवसात बळी गेला आणि ७८८३ नव्या रुग्णांची नोंद झाली. उत्तर प्रदेशात ४४७५ नवे रुग्ण सापडले. बिहारमध्ये ३७०० नव्या रुग्णांची नोंद झाली. यामुळे बुधवार सकाळपर्यंत २३ लाख २९ हजार इतकी नोंद झालेली कोरोनाच्या रुग्णांची संख्या २४ लाखांजवळ पोहोचल्याचे स्पष्ट होते.

देशात कोरोनाचे दरदिवशी ६० हजार रुग्ण आढळत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मंगळवारी ५५ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले. दरम्यान इस्रायलने भारताला ‘आर्टिफिशिल इंटेलिजन्स ‘(एआय)वर आधारित आधुनिक तंत्रज्ञान आणि सामग्री दिली आहे. भारतातील इस्रायलचे राजदूत रॉन माल्का यांनी ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ च्या(एम्स) संचालकांकडे हे आधुनिक तंत्रज्ञान सोपविले. यामध्ये ‘कॉन्टॅक्टलेस मॉनिटरिंग अ‍ॅप्लिकेशन्स, ‘अ‍ॅडव्हान्स मेडिकल मॅनेजमेंट सिस्टीम्स’, ‘एआय रोबोट्स’चा समावेश आहे.

जगातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २ कोटी ५५ लाखांपर्यंत पोहोचली आहे, तर या साथीमुळे दगावलेल्यांची संख्या ७ लाख ५० हजारांवर पोहोचली आहे. अमेरिकेतील कोरोनाच्या रुग्णाची संख्या ५३ लाखांवर, ब्राझीलची ३१ लाखांवर गेली आहे. यानंतर सर्वाधिक रुग्णांची नोंद भारतात झाली आहेत.

leave a reply