भारतातील कोरोनाच्या बळींची संख्या २१ हजारांवर

नवी दिल्ली/मुंबई – मंगळवारपासून बुधवारच्या सकाळपर्यंत देशात ४८२ जणांचा या साथीने मृत्यू झाला. यामुळे देशात या साथीने दगावलेल्यांची संख्या २०,६४२ वर पोहोचली होती. तर बुधवारी रात्रीपर्यंत देशभरात सुमारे आणखी ४०० रुग्ण दागवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे देशातील कोरोनाच्या बळींची संख्या २१ हजारांवर पोहोचली आहे. महाराष्ट्रातच चोवीस तासात १९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या साडे सात लाखांच्या पुढे गेली आहे.

कोरोनाच्या बळींची संख्या

महाराष्ट्रात दिवसभरात ६,६०३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे असून १९८ जणांचा बळी गेला आहे. मुंबईत चोवीस तासात ६२ जण दगावले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण बळींची संख्या साडे नऊ हजारांवर पोहोचली आहे. तसेच एकूण रुग्णांची संख्या २ लाख २३ हजारांजवळ पोहोचली आहे. तामिळनाडूत एकाच दिवसात ६४ जणांचा बळी गेला, तर ३,७५६ नवे रुग्ण आढळले. दिल्लीत दिवसभरात ४८ जणांचा बळी गेला आणि २,०३३ नव्या रुग्णांची नोंद झाली. कर्नाटकात पहिल्यादांच चोविस तासात दोन हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या राज्यात दिवसभरात ५४ जण दगावले आणि २,०६२ नवे रुग्ण आढळले. गुजरातमध्ये १२ जणांचा या साथीने मृत्यू झाला आणि १,०६२ नवे रुग्ण सापडले.

दरम्यान, जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २० लाख ५४ हजारांवर पोहोचली आहे. तर या साथीच्या एकूण बळींची संख्या साडे पाच लाखांवर गेली आहे. अमेरिकेतीलच या साथीच्या बळींची संख्या १ लाख ३१ हजार ५१४ वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या ३० लाखांच्या पुढे गेली आहे. ब्राझीलमधील रुग्णांची संख्या १७ लाखांजवळ पोहोचली आहे.

जगातिक आरोग्य संघटनेने कोरोनाव्हायरस हवेतूनही पसरत असल्याचे म्हटले आहे. याआधी हा विषाणू कोरोनाबाधितांच्या शिंकण्याने किंवा खोकल्याने पसरत असल्याचे डब्लूएचओने म्हटले होते. मात्र ३२ देशांच्या २३९ संशोधकांनी केलेल्या संशोधनात हा व्हायरस हवेत तरंगतो आणि श्वसनाद्वारे शरीरात प्रवेश करतो. याचे पुरावे संशोधनात सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे आता कोरोनासंदर्भांतील गाईडलाईन्स बदलण्याची आवश्यकता असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.

leave a reply