कोरोनामुळे जगभरात ३० लाखांहून अधिक बळी

- अमेरिकेत नव्या साथीसह चौथ्या लाटेचा इशारा

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाच्या साथीमुळे दगावणार्‍यांची संख्या ३० लाखांवर गेली आहे. ब्राझिल व युरोपसह भारतात कोरोनाची तीव्रता पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली असून बळींच्या संख्येत वेगाने भर पडण्यामागे हे प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. त्याचवेळी अमेरिकेत कोरोनाच्या नव्या साथीसह कोरोनाची चौथी लाट येत असल्याचा इशारा व्हाईट हाऊसच्या सल्लागारांनी दिला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला कोरोनामुळे जाणार्‍या बळींची संख्या २० लाखांवर गेली होती. मात्र त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात त्यात १० लाखांची भर पडली आहे. यामागे ब्राझिलसह युरोपिय देश व भारतात वाढणारी कोरोनाची वाढती तीव्रता प्रमुख कारण ठरले आहे. कोरोनाच्या नवनव्या ‘स्ट्रेन्स’मुळे (प्रकार) रुग्णांची तसेच बळींची संख्या वाढत असल्याचे वैद्यक तज्ज्ञांनी म्हटले आहे. सध्या जगात कोरोनामुळे दगावणार्‍या रुग्णांपैकी २५ टक्के रुग्ण ब्राझिलमधील असल्याचेही समोर आले आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक बळींची नोंद अमेरिकेत झाली असून बळींची संख्या पाच लाख, ५५ हजारांवर गेली आहे. तर ब्राझिलमध्ये कोरोनामुळे दगावणार्‍यांची संख्या ३ लाख, ३२ हजारांवर गेली आहे. जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या १३ कोटींवर गेली असून त्यातील सर्वाधिक तीन कोटींहून अधिक रुग्ण अमेरिकेतील असून ब्राझिल व भारतातील रुग्णांची संख्या प्रत्येकी एक कोटींहून अधिक झाली आहे. दरम्यान, अमेरिकेत कोरोनाची नवी साथ सुरू झाली असून चौथी लाट येऊ शकते, असा इशारा व्हाईट हाऊसमधील प्रमुख सल्लागार डॉक्टर मायकल ऑस्टनहोम यांनी दिला आहे. नवी साथ व चौथ्या लाटेसाठी नवनवे ‘स्ट्रेन्स’ हेच कारण असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी शक्य असेल, तर लस घेतलेल्या अमेरिकी नागरिकांनीही गरज नसल्यास हवाई प्रवास टाळावा, असा सल्लाही ऑस्टनहोम यांनी दिला आहे. अमेरिकेतील प्रमुख आरोग्यविषयक यंत्रणा ‘सीडीसी’ने लस घेतली असेल, तरी मास्क वापरणे आवश्यक असल्याची सूचनाही दिली आहे.

leave a reply