१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार

- पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली – देशभरात कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला १६ जानेवारीपासून सुरुवात होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. याआधी प्रवासी भारतीय दिनानिमित्त संवाद साधताना भारताच्या कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमाकडे सार्‍या जगाचे लक्ष लागल्याचे पंतप्रधान म्हणाले. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम भारतात राबविली जात आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

शनिवारी देशभरात कोरोना लसीकरणाची तीसरी ड्राय रन पाडली. कोरोनाच्या लसीकरण मोहिमेची जोरदार पूर्वतयारी देशभरात सुरू आहे. ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) कोरोनावरील दोन लसींना रविवारी मंजुरी दिली होती. यामध्ये ‘ऑक्सङ्गर्ड-एस्ट्राजेनेका’ने विकसित केलेल्या आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूटकडून उत्पादन घेण्यात येणार्‍या ‘कोविशिल्ड’ या लसीचा समावेश आहे. तसेच ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्च’च्या सहाय्याने (आयसीएमआर) भारत बायोटेकने विकसित केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’च्या लसीलाही आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे.

या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी १६ जानेवारीपासून देशात कोरोनाच्या लसीकरणाची मोहिम सुरू होणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधातील लढाईत थेट सहभागी असलेल्या दोन कोटी आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवक, पोलिसांना ही लस दिली जाणार आहे. या सर्वांना कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचे गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते. दरम्यान, ‘वर्ल्ड फार्मसी’ म्हणून जगात आपले स्थान निर्माण केलेला भारत कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमासाठी पूर्ण सज्ज असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात बनलेली लस भारत आपल्या जनतेला देणार आहे. भारतीय लसी जगात कोरोनाविरोधातील अंतिम निर्णायक लढाईत महत्त्वाची भूमीका बजावतील आणि मानवतेसाठी वरदान ठरतील. यामुळे सार्‍या जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. तसेच भारत इतकी मोठी लसीकरण मोहिम कशी राबवतो, याकडे सारे जग पाहत आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

leave a reply