कोरोना पुढच्या तीन महिन्यात युरोपामध्ये दोन लाखांहून अधिक जणांचा बळी घेईल

- ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’चा इशारा

दोन लाखांहून अधिककोपनहेगन/लंडन – कोरोनाचे वाढते संक्रमण व मंदावलेले लसीकरण या पार्श्‍वभूमीवर युरोपात येत्या तीन महिन्यात दोन लाखांहून अधिक जणांचा बळी जाईल, असा इशारा ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने दिला आहे. एका आठवड्याच्या अवधीत युरोपातील बळींच्या संख्येत 11 टक्क्यांची वाढ झाल्याकडे ‘डब्ल्यूएचओ युरोप’चे प्रमुख हॅन्स क्लुग यांनी लक्ष वेधले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ‘व्हेरिअंट’ समोर आला असून हा आतापर्यंतच्या ‘व्हेरिअंटस्‌’मधील सर्वाधिक संसर्गजन्य कोरोना असू शकतो, असे संशोधकांनी बजावले आहे.

युरोपातील कोरोना रुग्णांची संख्या साडेपाच कोटींवर गेली असून, 13 लाखांहून अधिक जण दगावले आहेत. अनेक युरोपिय देशांनी लॉकडाऊन अंतर्गत लावलेले निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण व बळी वाढण्यास सुरुवात झाली आहे. ‘डब्ल्यूएचओ युरोप’चे प्रमुख हॅन्स क्लुग यांनी याकडे लक्ष वेधले असून बळींची संख्या वाढण्याचा इशारा दिला आहे.

दोन लाखांहून अधिक‘गेल्या आठवड्यात युरोपमधील बळींच्या संख्येत 11 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. एका अभ्यासानुसार, 1 डिसेंबरपर्यंत युरोपमध्ये कोरोनामुळे 2 लाख 36 हजार जणांचा बळी जाण्याची शक्यता आहे. डब्ल्यूएचओ युरोपच्या 53 देशांपैकी 33 देशांमध्ये कोरोनाची तीव्रता वाढत आहे. संसर्गाचा दर वाढत असून यामागे डेल्टा व्हेरिअंट जबाबदार असल्याचे दिसत आहे. लसीकरणाचा वेगही मंदावत असून, शिथिल झालेले निर्बंध व पर्यटनातील वाढ हे घटकही साथीच्या तीव्रतेसाठी कारणीभूत ठरत आहेत’, असे ‘डब्ल्यूएचओ युरोप’चे प्रमुख हॅन्स क्लुग यांनी बजावले.

दोन लाखांहून अधिकयुरोपातील ब्रिटन, जर्मनी, रशिया यासारख्या देशांमध्ये पुन्हा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे समोर येत आहे. ब्रिटनमधील रुग्णांची संख्या प्रतिदिन 34 हजारांवर गेली असून बळींच्या संख्येनेही 100चा टप्पा ओलांडला आहे. रशियामध्ये रुग्णांची संख्या 20 हजारांनजिक असून 24 तासांमध्ये 800हून अधिक जणांचा बळी गेला आहे. तर जर्मनीत रुग्णांची संख्या दर दिवशी नऊ हजारांहून अधिक नोंदविण्यात येत आहे. फ्रान्समध्ये रुग्णांची संख्या 17 हजारांवर असून 24 तासांमध्ये 120 जणांचा बळी गेला आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा ‘व्हेरिअंट’ समोर आला आहे. हा नवा व्हेरिअंट आतापर्यंतच्या प्रकारातील सर्वाधिक ‘म्युटेट’ झालेला अर्थात बदल घडविलेला प्रकार असल्याचे आफ्रिकन यंत्रणांच्या अभ्यासातून समोर आले आहे. या नव्या ‘व्हेरिअंट’ला ‘सी.1.2’ असे नाव देण्यात आले असून हा ‘व्हेरिअंट ऑफ इंटरेस्ट’ असल्याचे सांगण्यात आले आहे. आफ्रिकेतील काही देशांसह युरोपिय देशांमध्येही हा ‘व्हेरिअंट’ आढळण्यास सुरुवात झाली आहे. कोरोनाचा हा नवा ‘व्हेरिअंट’ लसींना दाद न देणारा प्रकार ठरु शकतो, असे तज्ज्ञांनी बजावले आहे.

leave a reply