देशातील कोरोना रुग्णांची संख्या २१ लाखांवर

नवी दिल्ली – भारतात सलग तिसऱ्या दिवशी ६० हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने केवळ तीन दिवसातच सुमारे दोन लाखांची वाढ झाली आहे. यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २१ लाखांच्या पुढे गेली आहे. देशात आतापर्यंत या साथीमुळे ४३ हजाराहून अधिक रूग्ण दगावले आहेत.

रुग्णांची संख्या

गेल्या काही दिवसांपासून देशात दिवसाला ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना बाधित आढळत होते. तर आता दिवसाला ६० हजाराहून अधिक रुग्ण आढळू लागले आहेत. ऑगस्ट महिन्यात जगात आतापर्यंत सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद भारतात झाल्याचे अहवाल आहेत. २८ जुलैला भारतातील कोरोना रुग्णसंख्या १५ लाख होती. मात्र केवळ दहा दिवसातच कोरोना रुग्णसंख्येत ५ लाखांची वाढ झाली. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, नवी दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश या राज्यात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात कोरोना संक्रमण वाढत आहे. कोरोना साथीचा सर्वात जास्त फैलाव महाराष्ट्रामध्ये होत आहे.

शनिवारी महाराष्ट्रात कोरोनाचे १३,००० रूग्ण आढळले असून २७५ रुग्णांचा मृत्यू या साथीमुळे झाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या ५ लाखांवर पोहोचली आहे, तर आतापर्यंत १७ हजार रुग्णांचा मृत्यू या संक्रमणामुळे झाला आहे. मुंबईत एका दिवसात कोरोनाच्या १,३०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच ५८ जण या साथीत दगावले आहेत.

आंध्र प्रदेश राज्यात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. केवळ ९ दिवसातच या राज्यातील कोरोना संक्रमितांची संख्या १ लाखांवरून २ लाखांवर पोहोचली आहे. आंध्र प्रदेशात एका दिवसात कोरोनाचे १०,१७१ रूग्ण आढळले असून ८७ जण दगावले आहेत. कर्नाटकात चोवीस तासात ७,१७८ नवे कोरोना बाधित आढळले. त्यापैकी २,६६५ रूग्ण केवळ बंगळुरू मधील आहेत. या राज्यात एका दिवसात साथीत ९३ रूग्ण दगावले आहेत. त्यामुळे कर्नाटक राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १,७२,१०२ वर पोहोचली आहे. तामिळनाडू राज्यात एका दिवसात ५,८८३ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ११८ जण या साथीत दगावले. त्यामुळे या राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या तीन लाखांनजीक पोहोचली आहे.

दरम्यान इतर देशांच्या तुलनेत भारतातील कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे जास्त असले प्रमाण तरीही गेल्या दहा दिवसातील कोरोना संक्रमणाचे वाढते आकडे देशाच्या चिंता वाढवणारे ठरत आहेत .

leave a reply