देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २३ लाखांजवळ

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या २३ लाखांजवळ पोहोचली आहे. मंगळवारी देशात ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी सोमवारी देशात ५३ हजार ६०१ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. देशात दरदिवशी ५० ते ६० हजार नवे रुग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या दहा राज्यांमध्येच देशातील ८० टक्के रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यासाठी या दहा राज्यांची भूमिका महत्वाची ठरेल, असे पंतप्रधान म्हणाले.

२३ लाखांजवळ

देशात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या ४५५०० च्या पुढे पोहोचली आहे. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत सुमारे १० हजार कोरोना बाधितांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच सुमारे ५ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोनाच्या साथीचा सर्वाधिक फैलाव दिसून आलेल्या महाराष्ट्रात मंगळवारच्या एका दिवसात कोरोनाचे ११ हजारांहून अधिक रुग्ण सापडले. तसेच २५६ जणांचा बळी गेला.

आंध्र प्रदेशात ८७ जण दगावले आणि ९०२४ नवे रुग्ण आढळले. कर्नाटकात ८६ जणांचा बळी गेला, तसेच ६२५७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तामिळनाडूत ११८ जणांचा एका दिवसात बळी गेला आणि ५ हजार ८३४ जणांचा मृत्यू झाला. बिहारमध्ये एका दिवसात ४ हजारापेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

भारतात कोरोनाच्या अडीच कोटी चाचण्या आतापर्यंत घेण्यात आल्या आहेत. सोमवारी ७ लाखांपेक्षा अधिक चाचण्या घेण्यात आल्या होत्या. तसेच १५ लाखांहून अधिक रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. भारतात उपचार घेत असलेल्या कोरोनाच्या रुग्णांची टक्केवारी कमी झाली आहे आणि बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातर्फे देण्यात आली.

या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगाणा, पंजाब आणि बिहार या राज्यांच्या मुखमंत्र्यांशी पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. ज्या राज्यांमध्ये चाचण्या कमी होत आहे तिथे पॉझिटिव्ह रेट जास्त आहे त्यामुळे या राज्यांनी चाचण्या अधिक वाढवाव्यात असा सल्ला पंतप्रधान मोदी यांनी दिला. या दहा राज्यातच देशातील ८० टक्के कोरोनाबधित रूग्ण आढळत आहेत. त्यामुळे या राज्यांची कोरोना साथीच्या विरोधातील लढ्यात विजयी ठरण्यासाठी भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

leave a reply