२६/११च्या हल्ल्याची जखम देश कधीही विसरणार नाही

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई – मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याला १३ वर्षे झाली असून या निमित्ताने देशभरात या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या सुरक्षा दलांच्या जवानांचे व या हल्ल्यातील बळींचे देशाला सदैव स्मरण राहिल, असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटले आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा देश कधीही विसरणार नाही, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्ताचा भारत दहशतवादाचा नवी नीति आणि नव्या रितीने मुकाबला करीत असल्याचा संदेश दिला. पाकिस्तानने २६/११ च्या सूत्रधारांवरील खटल्याला वेग द्यावा, अशी मागणी करून यासाठी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकार्‍यांना समन्स बजावले आहे.

२६/११च्या हल्ल्याची जखम देश कधीही विसरणार नाही - पंतप्रधान नरेंद्र मोदीपाकिस्तानातून आलेल्या दहा दहशतवाद्यांनी मुंबईत २६/११चा हल्ला चढवून हाहाकार माजविला होता. या दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलांची जवळपास ६० तास चकमक सुरू होती. या भ्याड हल्ल्यात १६६ जणांचा बळी गेला होता. तसेच अमेरिका व इस्रायलचे नागरिक देखील या हल्ल्यात बळी पडले होते. यानंतर भारत व पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता वर्तविली जात होती. पण पाकिस्तानने या हल्ल्याशी आपला संबंध नाही, असे सांगून याला जबाबदार असलेल्या ‘नॉन स्टेट ऍक्टर्स’वर कारवाई करण्याची तयारी दाखविली होती. पाकिस्तानने या हल्ल्याच्या कारस्थानाबाबत कानावर हात ठेवले असले तरी हे हल्लेखोर दहशतवादी पाकिस्तानीच असल्याचे या देशाच्या माध्यमांनी उघड केले. मुंबई पोलीस दलाचे हवालादर शहीद तुकाराम ओंबळे यांनी अजमल कसाब याला जिवंत पकडल्याने, या हल्ल्यातील आपला सहभाग नाकारणे पाकिस्तानसाठी अशक्य कोटीतील बाब बनली होती.

यानंतरच्या काळात पाकिस्तानने २६/११चे कारस्थान आखणार्‍या हफीज सईद व लखीऊर रेहमान लख्वी या दहशतवाद्यांवर खटला चालविण्याचे नाटक उभे केले खरे. पण हा खटला पाकिस्तानच्या यंत्रणांनी विविध तांत्रिक कारणे देऊन रखडविला होता. भारताने वारंवार सज्जड पुरावे दिल्यानंतरही पाकिस्तानने हे पुरावे नाकारले होते. या प्रकरणी भारताने वेळोवेळी पाकिस्तानचा पर्दाफाश केला. २६/११च्या १३ व्या स्मरणदिनी देखील परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने या दहशतवादी हल्ल्याचा खटला वेगाने पुढे चालवावा, यासाठी समन्स बजावले.

तीन आठवड्यांपूर्वीच पाकिस्तानच्या न्यायालयाने दुसर्‍या एका प्रकरणात २६/११चा सूत्रधार असलेल्या हफीज सईद याची निर्दोष मुक्तता केली. आंतरराष्ट्रीय दडपण वाढल्यानंतर, पाकिस्तानचे सरकार हफीज सईद व त्याच्या दहशतवादी साथीदारांना नजरकैद किंवा तुरुंगात डांबल्याचा आभास निर्माण करते. पण हे दडपण कमी झाल्यानंतर हफीज सईद व त्याच्या सहकार्‍यांची सुटका केली जाते. अशा कारवायांमुळे पाकिस्तान दहशतवादाचा पुरस्कार करणारा देश असल्याची खात्री आता आंतरराष्ट्रीय समुदायालाही पटू लागली आहे.

दरम्यान, अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय असलेल्या पेंटॅगॉनचे माजी अधिकारी व विख्यात विश्‍लेषक मायकल रुबीन यांनी नुकत्याच लिहिलेल्या एका लेखात अमेरिकेने पकिस्तानातील दहशतवाद्यांच्या केंद्रांवर हल्ले चढविण्याची मागणी केली होती. मुंबईत झालेल्या २६/११च्या हल्ल्यात अमेरिकन नागरिकांचाही बळी गेला होता, याची आठवण रुबीन यांनी करून दिली. मुंबई, काबुल आणि कराची सारख्या शहरांमध्ये पाकिस्तान अमेरिकन नागरिकांचे रक्त सांडत आहे व हे हल्ले चढविणार्‍या दहशतवाद्यांना पाकिस्तान पाठिशी घालत आहे, अशी घणाघाती टीका रुबीन यांनी केली. अशा पाकिस्तानला त्याची किंमत मोजण्यास भाग पाडण्यावाचून गत्यंतर नसल्याचे रुबीन यांनी अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाला बजावले आहे.

leave a reply