देशाची परकीय गंगाजळी ४९० अब्ज डॉलर्सवर

RBIमुंबई – दोन महिने सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे देशातील आर्थिक व्यवहार मंदावलेले असतानाही एका आठवड्यात देशाच्या परकीय गंगाजळीत ३ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे. यामुळे देशाकडील गंगाजळी वाढून ४९०.०४४ अब्ज डॉलर्स या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. याआधी १५ मे रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय गंगाजळीत १.७२ अब्ज डॉलर्सने वाढ झाली होती.

‘रिझर्व्ह बँके’ने २२ मे रोजी संपलेल्या आठवड्यातील देशाकडील परकीय गंगाजळीची माहिती जाहीर केली. १५ मे रोजी संपलेल्या आठवड्यात देशाकडील परकीय गंगाजळी ४८७.०४ अब्ज डॉलर्सवर पोहोचली होती. ती वाढून २२ मे रोजी संपलेल्या आठवड्यात ४९० अब्ज डॉलर्सवर पोहोचल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले. परकीय गंगाजळीमध्ये सर्वाधिक वाढ ही परकीय चालन साठ्यात झाली आहे. देशाकडील परकीय चलनसाठा ४५१.७०६ अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे. मात्र देशाकडील सुवर्णसाठ्याचे मूल्य १२.७ कोटी डॉलर्सने घटले असून ते ३२.७७९ अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आले आहे.

दरम्यान ‘आरबीआय’ने बँक ऑफ इंडिया आणि कर्नाटक बँकेवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आर्थिक दंड ठोठावला आहे. बँक ऑफ इंडियावर पाच कोटी रुपयांचा, तर कर्नाटक बँकेला १.२ कोटींचा दंड ठोठाविण्यात आला आहे.

leave a reply