देशाची इंधन तेल साठवणुकीची क्षमता पाच वर्षात दुप्पट करणार

- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – पुढील पाच वर्षात देशाची इंधन तेल साठवणुकीची क्षमता दुप्पट करण्यासाठी योजना आखण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केले. तसेच नैसर्गिक वायूचा वापर चार पटीने वाढविण्यासाठीही सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

गुजरातच्या गांधीनगर येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात शनिवारी पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी भारताची भविष्यतील ऊर्जा गरज आणि त्या अनुषंगाने सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची पंतप्रधान मोदी यांनी माहिती दिली. देशात इंधन तेल साठविण्याची क्षमता पुढील पाच वर्षात दुप्पट करण्याचा सरकारचा निर्धार असल्याचे पंतप्रधान म्हणाले. यादृष्टीने योजना आखल्या जात आहेत, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.

जून महिन्यात एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पुढील दहा वर्षात देशातील इंधन तेल साठवणूक क्षमता दुप्पट होईल, असे म्हटले होते. मात्र पंप्रधानांनी पाच वर्षात ही क्षमता दुप्पट करण्याची योजना आखण्यात येत असल्याचे जाहीर केले. सध्या देशाकडील इंधन साठवणूक क्षमता 25 कोटी टन इतकी आहे.

याशिवाय नैसर्गिक वायूचा वापर वाढविण्यावर सरकार भर देत असल्याचे पंप्रधानांनी स्पष्ट केले. स्वच्छ आणि स्वस्तनैसर्गिक वायूचावापर वाढल्याने इंधन तेलाच्या आयातीवरील निर्भरता कमी होईल. सध्या देशच्या एकूण ऊर्जा वापरामध्ये 6 टक्के इतकाच वाटा नैसर्गिक वायूचा आहे. मात्र इंधन वायूचा वापर चार पटीने वाढविण्याकडे सरकार लक्ष पुरवीत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. तसेच अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची क्षमता 2022 पर्यंत 175 गिगावॅटवर, तर 2030 पर्यंत 450 गिगावॅटवर नेण्यात येईल असे सांगून 2018 च्या खरीपर्यंत ही क्षमता केवळ 75 गिगावॅट होती, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.

दरम्यान, ऑइल इंडिया लिमिटेडने (ओआयएल) ओडिशाच्या महानदीच्या खोऱ्यात इंधन तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे शोधण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. शुक्रवारी पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या मोहिमेचे उद्घाटन केले. यासाठी 220 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या मोहिमेअंतर्गत 8215 चौरस किलोमीटर क्षेत्राचा सेस्मिक डाटा गोळा करून इंधन साठ्यांचा शोध घेतला जाणारा आहे. ओडिशात पुरी, खुर्दा, कटक, केंद्रपारा, बालासोर, भद्रक, केओंझार आणि मयूरभंजी येथे इंधन आणि नैसर्गिक वायूचे साठे पसरलेले आहेत.

leave a reply