कोरोना संक्रमित मुलांमध्ये सहसा लक्षणे दिसत नाहीत

- डॉ.व्ही.के.पॉल यांची माहिती

नवी दिल्ली – कोरोनाच्या पुढील लाटेत अधिक मुले संक्रमित होऊ शकतात, असे काही तज्ज्ञ सातत्याने दावे करीत आहेत. मात्र केंद्रीय आरोग्य विभागाकडून याला कोणताही आधार नसल्याचे सांगत हे दावे नाकारण्यात आले होते. नुकताच मुंबईत करण्यात आलेल्या एका सिरो सर्वेक्षणात मुंबईत 50 टक्के मुलांना कोरोनाची लागण होऊन गेल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. या सर्वेक्षणात नमुने घेण्यात आलेल्या सुमारे 51 टक्के मुलांमध्ये अँटिबॉडी आढळल्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही.के.पॉल यांनी महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले आहे व मुलांनाबाबत वाटणार्‍या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोना संक्रमित मुलांमध्ये सहसा लक्षणे दिसत नाहीत - डॉ.व्ही.के.पॉल यांची माहितीकोरोनाग्रस्त झालेल्या मुलांमध्ये सहसा कोरोनाची लक्षणे दिसून येत नाहीत, तसेच त्यांना क्वचितच रुग्णालयात दाखल करावे लागते. कोरोना संक्रमित फार कमी मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागू शकते, असे डॉ. पॉल यांनी म्हटले आहे. कोरोनाची सौम्य लागण झालेली बहुतांश मुले रुग्णालयात दाखल न करीता बरी झाली आहे, तसेच ज्या मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले त्याची प्रतिकारशक्ती कमी होती व त्यांना इतरही आजार होते, असे डॉ. पॉल यांनी लक्षात आणून दिले. तसेच मुलांना संसर्ग होऊ नये यासाठी दिलेले सर्व नियम पाळण्याच्या व काळजी घेण्याच्या सूचना आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आल्या.

कोरोनाची दुसरी लाट अजून पुरती ओसरलेली नाही. अजूनही 40 ते 45 हजार रुग्ण दरदिवसाला मिळत असून सुमारे हजार जणांचा बळी जात आहे. महाराष्ट्र, केरळ सारख्या काही राज्यांमध्ये अजूनही 100 पेक्षा जास्त जणांचा बळी जात असून याबाबत केंद्रीय आरोग्य विभागाने या राज्यांना सावध केले आहे. तसेच 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्ह दर असलेल्या जिल्ह्यांमध्ये कंटेनमेंट झोनचे नियम कठोरपणे पालन करा, असा सूचनाही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या. याबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांनी या राज्यांना पत्रही लिहले आहे. दरम्यान, कोरोनाच्या लसीमुळे बर्‍याच मोठ्या प्रमाणावर गैरसमजूती आहेत. ही लस घेतल्यांने पुरुषांना नपुंसकत्व आणि स्त्रीयांना व्यंध्यत्त्व येते अशीही एक गैरसमजूत आहे. याबाबतही बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले. कोरोना लसीमुळे नपुसंकत्व प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याचा कोणाताही वैज्ञानिक पुरवा आतापर्यंत सापडलेला नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. पोलिओ लस घेतल्यावर भविष्यात नपुसंकत्त्वाचा सामना करावा लागू शकतो, अशी चुकीची माहिती काही वर्षांपूर्वी पसरविण्यात आली होती, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. तसेच लसींवर सर्व शास्त्रीय मार्गाने निरिक्षण व तपासणी होत असते, असेही आरोग्य मंत्रालयाने अधोरखित केले.

leave a reply