कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे आफ्रिका खंडात हाहाकार

केपटाऊन – आफ्रिका खंडात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेने हाहाकार उडविला असून एका आठवड्यात रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून अधिक वाढ होत असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे जाणार्‍या बळींची संख्याही सुमारे १५ टक्क्यांनी वाढली असून अवघ्या पाच देशांमध्ये ७५ टक्के नवे रुग्ण आढळल्याचे उघड झाले आहे. आफ्रिका खंडाची लोकसंख्या सुमारे १.३ अब्ज असून त्यातील एक टक्का नागरिकांचेही अद्याप लसीकरण झालेले नाही आणि ही बाब धोक्याची घंटा ठरु शकते, असा इशारा ‘आफ्रिका सीडीसी’ या यंत्रणेने दिला आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे आफ्रिका खंडात हाहाकारआफ्रिकेतील आरोग्य यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडातील कोरोना रुग्णांची संख्या ५१ लाखांवर जाऊन पोहोचली आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका दक्षिण आफ्रिका देशाला बसला असून या देशातील रुग्णसंख्या तब्बल १७ लाख, ८६ हजारांवर गेली आहे. उत्तर आफ्रिकेचा भाग असणार्‍या मोरोक्कोमध्ये सव्वापाच लाख रुग्ण आढळले आहेत. ट्युनिशिआमध्ये तीन लाख, ७६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त युगांडा, नामिबिया व झांबिया या देशांमध्येही रुग्णसंख्या वाढत असल्याचे समोर आले आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे आफ्रिका खंडात हाहाकारजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आफ्रिका खंडात कोरोनाच्या ९१ हजार रुग्णांची नोंद झाली होती. दुसर्‍या आठवड्यात हीच आकडेवारी एक लाख, १६ हजार, ५०० वर जाऊन पोहोचली. आफ्रिकेतील २२ देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत तब्बल २० टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ने (डब्ल्यूएचओ) दिली आहे. ‘एका आठवड्यात रुग्णांच्या संख्येत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ही अत्यंत चिंतेची बाब ठरते. आफ्रिका खंडात कोरोनाची तिसरी लाट हाहाकार उडवित आहे. कोरोनाची साथ उलटल्यानंतर काय होते हे भारत व इतर देशांमध्ये दिसून आले आहे. आरोग्ययंत्रणांवर जबरदस्त ताण पडून त्या अपयशी ठरु शकतात’, असे ‘डब्ल्यूएचओ’च्या वरिष्ठ अधिकारी डॉक्टर मात्शिदिसो मोएती यांनी बजावले.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेमुळे आफ्रिका खंडात हाहाकारआफ्रिका खंडातील वाढत्या रुग्णसंख्येमागे कोरोनाव्हायरसच्या नव्या प्रकारांचा (व्हेरिअंट) प्रसार, संसर्ग रोखण्यासाठीच्या नियमांचे पालन न होणे व अपुरे लसीकरण यासारखे घटक कारणीभूत असल्याचा दावा ‘डब्ल्यूएचओ’ व ‘आफ्रिका सीडीसी’कडून करण्यात आला. आफ्रिकेची एकूण लोकसंख्या १.३ अब्जांच्या आसपास असून आतापर्यंत फक्त एक कोटी, २० लाख जणांचे लसीकरण झाले आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या एक टक्क्याहून कमी असल्याकडे आरोग्य यंत्रणांनी लक्ष वेधले. आफ्रिकेतील काही देशांमध्ये अजून लसीकरणाला सुरुवातही झाली नसल्याची माहितीही समोर आली आहे.

कोरोनामुळे आफ्रिका खंडात एक लाख, ३६ हजार जणांचा बळी गेला आहे. इतर देशांच्या तुलनेत ही संख्या कमी दिसत असली तरी अनेक आफ्रिकी देशांमध्ये कोरोनाच्या चाचण्या पुरेशा प्रमाणात होत नाही, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधत आहेत.

leave a reply