इराणच्या राजधानीत स्फोटासह रेल्वे आणि सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ले

तेहरान – शनिवारी पहाटे इराणची राजधानी तेहरान एका शक्तीशाली स्फोटाने हादरली. राष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या मुख्यालयाजवळील बागेत हा स्फोट झाला. या स्फोटाच्या आधी व नंतर इराणच्या रेल्वे यंत्रणा आणि दोन सरकारी संकेतस्थळांवर सायबर हल्ले झाले. यापैकी रेल्वेच्या घटनेत हॅकर्सनी इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचा फोन नंबर सार्वजनिक केला. चार दिवसांपूर्वी इराणच्या कराज येथील गोदामाला संशयास्पदरित्या आग लागली होती.

सायबर हल्लेइराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी तेहरानमधील मिल्लत पार्क या बागेत स्फोट झाला. पहाटेच्या सुमारास हा स्फोट झाल्यामुळे जीवितहानी टळल्याचे इराणी यंत्रणांनी स्पष्ट केले. पण हा स्फोट कशामुळे झाला, यामागील कारण काय, या प्रश्‍नांची उत्तरे इराणी यंत्रणांनी दिलेली नाहीत. अज्ञात वस्तूचा स्फोट झाला असून तपास सुरू असल्याचे इराणचे उपपोलीस प्रमुख जनरल हमिद होदावंद यांनी सांगितले.

सायबर हल्लेया स्फोटासंबंधी काही व्हिडिओ इराणी सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते. स्फोटाच्या हादर्‍याने आसपासाच्या इमारतींचे नुकसान झाल्याचे या व्हिडिओत दाखविले होते. पण इराणच्या शत्रूंनी अपप्रचारासाठी हा जुना व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप होदावंद यांनी केला. पण राष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या मुख्यालयाजवळ हा स्फोट झाल्यामुळे याकडे संशयाने पाहिले जाते. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून इराणमध्ये सुरू असलेल्या संशयास्पद स्फोटांमध्ये आणखी एका घटनेची भर पडली.

या स्फोटाच्या आधी शुक्रवारी संध्याकाळी इराणच्या रेल्वे ग्रीडवर सायबर हल्ला झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. यामुळे रेल्वेगाड्या उशीराने धावत असल्याच्या किंवा रद्द झाल्याच्या सूचना इराणमधील सर्व रेल्वे स्टेशनवरील डिजिटल बोर्डवर दाखविण्यात आले. यामुळे बराच काळ गोंधळ माजला होता. रेल्वेयंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे संदेश फिरत होते.

सायबर हल्लेयासंबंधी तक्रार नोंदविण्यासाठी किंवा आपल्या अडचणी मांडण्यासाठी रेल्वे स्टेशनवरील डिजिटल बोर्डवर एक फोन नंबर प्रसिद्ध झाला होता. पण हा नंबर इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातुल्ला खामेनी यांचा असल्याचे उघड झाल्यानंतर इराणी यंत्रणांची तारांबळ उडाली होती. हा सायबर हल्लेखोरांचा डाव होता, असा आरोप इराणी यंत्रणा करीत आहेत.

या सायबर हल्ल्याला चोवीस तास पूर्ण होण्याआधी शनिवारी इराणच्या वाहतूक आणि नागरी विकास या दोन मंत्रालयांच्या संकेतस्थळावरही सायबर हल्ले झाले. यामुळे दोन्ही मंत्रालयाचे कामकाज ठप्प झाले होते. रेल्वे आणि सरकारी मंत्रालयांच्या संकेतस्थळांवरील हल्ल्यांमागे रॅन्समवेअर हल्ला असण्याची शक्यता असल्याचा दावा इराणी नेत्यांनी केला आहे. याआधीही इराणवर अशाचप्रकारे रॅन्समवेअरचे हल्ले झाले होते, असा दावा इराणी यंत्रणा करीत आहेत. या हल्ल्यांसाठी इराणने अमेरिका व इस्रायलला दोषी धरले होते.

leave a reply