रशियन राष्ट्राध्यक्षांच्या वक्तव्यानंतर नैसर्गिक इंधनाच्या दरांमध्ये घट

नैसर्गिक इंधनमॉस्को/वॉशिंग्टन – रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नैसर्गिक इंधनवायूच्या दरांमध्ये तब्बल २२ टक्के घसरण झाल्याचे समोर आले आहे. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी, रशिया युरोपला करण्यात येणारा इंधनपुरवठा वाढविण्यास तयार असल्याचे म्हटले होते. युरोपमध्ये नैसर्गिक इंधनवायुची मागणी सातत्याने वाढत असून, त्या तुलनेत राखीव साठा घसरला आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात युरोपला इंधनाची टंचाई जाणवू शकते, असा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात येत आहे.

बुधवारी युरोपातील नैसर्गिक इंधनवायुचे दर हजार घनमीटरमागे १,९३७ डॉलर्सपर्यंत कडाडले होते. सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत दरांमध्ये तिपटीने वाढ झाली आहे. या वाढत्या दरांमुळे युरोपिय देशांच्या अर्थव्यवस्थेवर इंधनाच्या वाढत्या खर्चाचा बोजा पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. दर वाढत असतानाच, रशियातून होणारा पुरवठा घटविण्यात येत असल्याचे दावे युरोपिय नेत्यांकडून करण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी, रशिया युरोपला करण्यात येणारा इंधनपुरवठा वाढविण्यास तयार असल्याचे वक्तव्य केले.

पुतिन यांनी रशियन कंपनी ‘गाझप्रोम’ला युक्रेनच्या माध्यमातून युरोपिय देशांना पुरविण्यात येणारा इंधनवायू पूर्ण क्षमतेने पुरवावा, असे निर्देश दिल्याचेही सांगण्यात येते. त्यांच्या वक्तव्यानंतर गुरवारी नैसर्गिक इंधनवायुचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. ‘इंटरकॉन्टिनेंटल एक्सेंज’मधून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यासाठी झालेल्या व्यवहारांसाठी दर हजार घनमीटरमागे ९७३ डॉलर्सचा दर आकारण्यात आला आहे. बुधवारच्या तुलनेत दरांमध्ये सुमारे २२ टक्के घसरण झाल्याची नैसर्गिक इंधनमाहितीही सूत्रांनी दिली.

रशिया इंधनाचा वापर करून पुन्हा युरोपिय देशांना वेठीस धरेल, असे इशारे अमेरिकी विश्‍लेषक व माध्यमांकडून देण्यात येत आहेत. सध्याच्या रशियाच्या हालचालींमागे अमेरिकेतील बायडेन प्रशासनाची धोरणे कारणीभूत असल्याचा दावाही करण्यात येत आहे. यापूर्वीही रशियाने युक्रेनबरोबरील वादाचे कारण पुढे करून युरोपिय देशांना करण्यात येणारा इंधनपुरवठा कमी केला होता.

काही विश्‍लेषक इंधनाचा मुद्दा पुढे करून रशिया युरोपिय देशांशी जवळीक वाढविण्याचा प्रयत्न करु शकतो, याकडेही लक्ष वेधत आहेत. सध्या अफगाणिस्तानमधील माघार तसेच ‘ऑकस डील’मुळे अमेरिका व युरोपमधील संबंधांमध्ये तणाव आहे. याचा फायदा रशिया उचलू शकतो, असा दावा विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply