संरक्षणमंत्र्यांची अरुणाचल आणि नागालँडच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

नवी दिल्ली – सोमवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी अरुणाचल प्रदेश आणि नागालँडच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी या राज्यांमधील प्रकल्प आणि इतर संवेदनशील मुद्यांवर चर्चा पार पडली. लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये तणाव वाढलेला असताना ईशान्य भारतातील या दोन राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी संरक्षणमंत्र्यांबरोबर केलेली बैठक अत्यंत महत्त्वाची ठरते.

अरुणाचल आणि नागालँड

सोमवारी अरुणाचलचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. यावेळी महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याचे अरुणाचलच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले. त्याचे तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत. अरुणाचल प्रदेशमध्ये सीमेवर चिनी सैन्यांच्या हालचाली वाढत आहेत. ही पार्श्वभूमी या बैठकीमागे असल्याचे सांगितले जाते. तसेच काही दिवसांपूर्वी चीनने अरुणाचलमधल्या पाच जणांचे अपहरण केले होते. भारताच्या दबावानंतर चीनने या पाच जणांची सुटका केली होती. या संर्दभात चर्चा झाल्याची शक्यता वर्तविली जाते.

त्याचवेळी नागालँडचे मुख्यमंत्री नेईफु रिओ यांच्याबरोबरील बैठकीत कोहिमामधल्या ‘सेईथु’ विमानतळासंर्दभात चर्चा पार पडली. धोरणात्मकदृष्टया हे विमानतळ अत्यंत महत्त्वाचे ठरते. तसेच ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’कडून उभारल्या जाणाऱ्या ‘बोकाजन- बोत्सा’ रस्ते प्रकल्पावर यावेळी चर्चा झाली.

leave a reply