संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लडाखला भेट देणार

नवी दिल्ली – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग येत्या शुक्रवारी लडाखच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गलवान व्हॅलीतील संघर्षानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंग पहिल्यांदाच या सीमाभागाला भेट देत असून लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे हे देखील त्यांच्यासोबत असतील. यावेळी संरक्षणमंत्री आणि लष्करप्रमुख भारतीय सैनिकांशी संवाद साधणार असून लडाखमधील सुरक्षेचा आढावा घेणार आहेत. संरक्षणमंत्र्यांचा हा दौरा भारत सरकार सीमावादाबाबत अत्यंत संवेदनशीलता दाखवत असल्याचा संदेश देणारा ठरतो.

Ladakhगलवान व्हॅलीतील संघर्षात भारतीय सैनिकांकडून चोप खाल्ल्यानंतर चीनने लडाखच्या इतर भागात आपल्या जवानांची तैनाती वाढवत नेली आहे. गेल्या ७२ तासात चीनने लडाखच्या सीमाभागात लष्कराच्या दोन डिव्हिजन म्हणजे वीस हजार जवान तैनात केल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी आणि लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग येत्या शुक्रवारी लडाखमध्ये दाखल होतील. यावेळी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या भारतीय लष्कराच्या त्रिशूल डिव्हिजनचे वरिष्ठ लष्करी अधिकारी देखील उपस्थित असतील. लष्करी अधिकाऱ्यांबरोबरच्या या चर्चेनंतर संरक्षणमंत्री गलवान व्हॅलीत पराक्रम गाजविणाऱ्या व लेह येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या भारतीय सैनिकांनाही भेटणार आहेत.

लडाखमधील तणाव कमी करण्यासाठी भारत आणि चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी पार पडलेली तिसरी बैठक अकरा तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतरही अपयशी ठरली. लडाखच्या सीमावादावर चीनच्या कुठल्याही मागण्या मान्य करणार नसल्याचे भारतीय लष्करी अधिकाऱ्यांनी निक्षून सांगितले. त्याचबरोबर चीनने ‘फिंगर ८’ पर्यंतच्या भागातून पूर्ण माघार घ्यावी, अशी मागणी भारताने यावेळी केली होती. भारत व चीनच्या लष्करी अधिकाऱ्यांमधील ही चर्चा फिस्कटल्यानंतर पुढच्या काही तासातच संरक्षणमंत्र्यांच्या या दौऱ्याची घोषणा करण्यात आली.

दरम्यान, ‘पँगॉन्ग त्सो’च्या भागात आपला अधिकार प्रस्थापित करण्यासाठी चीनच्या लष्कराची धडपड सुरू आहे. पण या सरोवर क्षेत्रातून चीनला मागे ढकलण्यासाठी भारतीय नौदलाच्या स्पीडबोट्स लवकरच इथे तैनात केल्या जातील. काही आठवड्यांपूर्वी तीनही संरक्षणदल प्रमुखांच्या बैठकीत तसा निर्णय घेण्यात आल्याची माहिती दिली जाते. यामुळे लडाखच्या सीमेवर एकाचवेळी देशाचे तीनही संरक्षणदले चीनसमोर खडे ठाकणार आहेत.

leave a reply