संरक्षणमंत्र्यांचा चीनला नवा इशारा

नवी दिल्ली – जगातील कुठलीही शक्ती भारतीय सैनिकांना लडाखमध्ये गस्त घालण्यापासून रोखू शकत नाही. या क्षेत्रात देशाच्या सार्वभौमत्त्वाचे रक्षण करीत असताना कर्नल संतोष बाबू आणि त्यांचे १९ सहकारी शहीद झाले होते, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटले आहे. राज्यसभेत लडाखमधील परिस्थितीची माहिती देताना, संरक्षणमंत्र्यांनी चीनला आणखी एकदा खरमरीत इशारा दिला आहे. भारत आपल्या सार्वभौमत्वाशी कुठल्याही प्रकारे तडजोड करणार नाही, सारा देश सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या मागे एकजूटीने खंबीरपणे उभा आहे, असे राजनाथ सिंग यांनी चीनला बजावले. त्याचवेळी संरक्षणमंत्र्यांच्या भाषणात गलवान व्हॅलीतील संघर्षात चिनी लष्कराची भारतापेक्षा अधिक हानी झाल्याचा संदर्भ आला होता. ही बाब चीनला चांगलीच झोंबल्याचे दिसत आहे.

चीनला नवा इशारा

राज्यसभेत बोलताना संरक्षणमंत्र्यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या घडामोडींची माहिती दिली आणि यावरील भारताची भूमिका परखडपणे मांडली. आपली चीनच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा झाली व परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशीही चर्चा केली. या चर्चेत सीमावाद राजनैतिक वाटाघाटींद्वारे सोडविण्याचे मान्य करण्यात आले होते. पण त्यानंतरच्या काळातही चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील आपल्या लष्कराच्या हालचाली सुरू ठेवल्या आहेत. इतकेच नाही तर, इथली यथास्थिती बदलण्याचा प्रयत्नही चिनी लष्कराकडून केला जात आहे. भारत हे कधीही खपवून घेणार नाही. आतापर्यंत चिनी लष्कराचे सारे प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडले आहेत. भारतीय सैन्याचा पराक्रम व मनोबल अतुलनीय आहे, असे उद्गार राजनाथ सिंग यांनी काढले.

भारतीय लष्कराला लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालताना चीनचे लष्कर रोखत आहे का, अशी शंका राज्यसभेच्या काही सदस्यांनी उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना संरक्षणमंत्र्यांनी लडाखमध्ये गस्त घालण्यापासून भारतीय सैन्याला जगातील कुठलीही शक्ती रोखू शकत नाही, असे स्पष्ट केले. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पुढे येण्याचा प्रयत्न करणार्‍या चिनी जवानांशी संघर्ष झाल्यामुळे कर्नल संतोष बाबू आणि त्यांच्या १९ सहकार्‍यांना वीरगती प्राप्त झाली, ही बाब संरक्षणमंत्र्यांनी यावेळी लक्षात आणून दिली. त्याचवेळी या संघर्षात भारतापेक्षाही चीनला अधिक हानी सोसावी लागली, असे संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे. त्यांनी दिलेली ही माहिती चीनला चांगलीच झोंबल्याचे दिसत आहे.

चीनला नवा इशारा

चिनी लष्करासाठी भारतविरोधी प्रचार युद्धाची धूरा वाहणारे कम्युनिस्ट राजवटीचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने गलवान संघर्षाबाबत भारत खोटी माहिती देत असल्याचा कांगावा केला आहे. त्याचवेळी लडाखच्या क्षेत्रात चिनी जवानांना सर्वोत्तम गोष्टींचा पुरवठा केला जात असून इथे त्यांना गरम अन्नही मिळत आहे. त्यामुळे आणखी कितीही दिवस चिनी जवान या क्षेत्रात राहू शकतात, असे दावे ग्लोबल टाईम्सने ठोकले आहेत. शिवाय या क्षेत्रातील चीनच्या पायाभूत सुविधा देखील भारताच्या तुलनेत खूपच प्रगत असल्याची दर्पोक्तीही ग्लोबल टाईम्सने केली आहे. तसेच चिनी लष्कराचे मनोबल, क्षमता आणि संख्याबळ याची भारतीय सैन्याशी तुलनाच होऊ शकत नाही, अशा बढाया चीनच्या या सरकारी दैनिकाने मारल्या आहेत.

ग्लोबल टाईम्सने कितीही बढाया मारल्या तरी, लडाखच्या क्षेत्रात तैनात असलेल्या चिनी जवानांची अवस्था दयनीय बनल्याचे उघड होऊ लागले आहे. लडाखच्या वातावरणाची सवय नसलेल्या चिनी जवानांना इथे आता श्वसनाचा त्रास होऊ लागल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचवेळी या क्षेत्रात तैनात असलेले भारतीय सैनिक कबड्डी खेळत असल्याचे व्हिडीओज प्रसिद्ध झाले आहेत. पुढच्या काळात ज्या प्रमाणात हिवाळा वाढत जाईल, त्या प्रमाणात चीनच्या लष्कराची हुडहूडीही वाढत जाणार असल्याचे आत्तापासूनच दिसू लागले आहे. त्यामुळे लडाखच्या सीमेवर युद्ध करणे दूरच राहिले, इथे टिकून राहणे देखील चिनी जवानांसाठी फार मोठे आव्हान ठरू शकते. अशा परिस्थितीत, ग्लोबल टाईम्सकडून मारल्या जाणार्‍या फुशारक्यांवर विश्वास ठेवायला आंतरराष्ट्रीय माध्यमे तयार नाहीत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनचे नाही तर भारतीय सैन्य वर्चस्व गाजवित असल्याचे आंतरराष्ट्रीय माध्यमांना मान्य करावे लागत आहे.

leave a reply