देशातील कोरोनाच्या 80 टक्के नव्या रुग्णांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग

नवी दिल्ली – देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्‍वभूमीवर चिंता वाढविणारा निष्कर्ष समोर आला आहे. देशात नोंद होत असलेल्या कोरोनाच्या नव्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्ग होत असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने तयार केलेल्या ‘सार्स कोव्ह-2 जिनोम कन्सोर्टीयम’चे (आयएनएसएसीओजी) सह अध्यक्ष डॉ. एन.के.अरोरा यांनी म्हटले आहे. कोरोनासंदर्भाती नॅशनल टास्क फोर्सचे सदस्य असलेल्या डॉ. आरोरा यांनी कोरोनाच्या अल्फा व्हेरिअंटपेक्षा डेल्टा व्हेरिअंट 40 ते 60 टक्के अधिक वेगाने संक्रमण फैलावत असल्याचा दावा एका अभ्यासाच्या आधारे केला आहे.

देशातील कोरोनाच्या 80 टक्के नव्या रुग्णांना डेल्टा व्हेरिअंटचा संसर्गदेशात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची सातत्याने भीती व्यक्त केली जात आहे. कित्येक युरोपिय देशात, तसेच आशियाई, आफ्रिकन देशात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. अमेरिकेतही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढले असून यासाठी कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट जबाबदार असल्याचे दावे केले जात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही नुकत्याच एका अहवालात 100 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा डेल्टा व्हेरिअंट पोहोचल्याचे म्हटले होते. भारतातही दुसर्‍या लाटेसाठी कोरोनाचा हाच व्हेरिअंट जबाबदार होता, हे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्‍वभूमीवर डॉ.एन.के.अरोरा यांनी सध्या देशात आढळत असलेले कोरोनाचे 80 टक्के नवे रुग्ण हे याच व्हेरिअंटने संक्रमित असल्याचे म्हटले आहे. ‘आयएनएसएसीओजी’कडून कोरोनाच्या सर्व व्हेरिअंटवर लक्ष ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामागे एखाद्या व्हेरिअंटचे संक्रमण वाढत असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर नियंत्रण मिळविणे हा उद्देश आहे. त्यामुळे देशातील वेगवेळ्या भागात जिनोम सिक्वेन्सिंग तपासणार्‍या प्रयोगशाळा उभारण्यात येत आहेत. प्रत्येक भागात अशा प्रयोगशाळा उभ्या राहिल्यास त्या त्या भागात पसरणार्‍या व्हेरिअंटची ओळख पटवता येईल, अशी माहिती डॉ. अरोरा यांनी दिली.

देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचे 11 राज्यात आतापर्यंत 55-60 इतकीच प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे. मात्र डेल्टा प्लसच्या संक्रमणाचा वेग, या व्हेरियंटची तीव्रता आणि लसी त्यावर किती परिणामकारक ठरतात, याचा अभ्यास अद्याप पुर्ण झालेला नाही, असेही डॉ. अरोरा म्हणाले.

मात्र सध्या डेल्टा व्हेरिअंटच अधिक संक्रमण पसरवित असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पण सुदैवाने भारतात लसीकरणासाठी वापरण्यात येणार्‍या दोन्ही लसी या डेल्टा व्हेरिअंटवर प्रभावी आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका अभ्यासात ते स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त जणांचे लसीकरण झाल्यास या कोरोनाच्या साथीचे संक्रमण रोखता येईल, असे अरोरा यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा एकदा जनतेला लस घेण्याचे आवाहन केले. कोरोनाविरोधातील लढाईत आपल्या बाहुवर लस घेऊन बाहुबली व्हा, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

leave a reply