जी7 व युरोपिय महासंघाकडून कोरोनाच्या पारदर्शी तपासाची मागणी

जी7लंडन – औद्योगिकदृष्ट्या पुढारलेल्या अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली व जपान या ‘जी7’ देशांनी कोरोनाच्या साथीचा नव्याने तपास करण्याची मागणी जागतिक आरोग्य संघटनेकडे केली. युरोपिय महासंघाने देखील कोरोनाचा नव्याने तपास करावा अशी मागणी केली. ‘ही साथ नक्की कुठून आली व कशी पसरली हे जाणून घेण्याचा अधिकार जगाला आहे. म्हणूनच याचा विश्‍वासार्ह तपास झाला पाहिजे’, असे युरोपिय महासंघाने म्हटले आहे.

ब्रिटनमध्ये ‘जी7’ची बैठक सुरू होत असून यामध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया हे देश देखील सहभागी होणार आहेत. जगातील प्रमुख लोकशाहीवादी देश या निमित्ताने एकत्र येत असून कोरोनाच्या साथीने घातलेल्या थैमानानंतर ‘जी7’च्या या बैठकीचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले आहे. अमेरिका व ब्रिटनच्या माध्यमांनी कोरोनाच्या साथीला चीन जबाबदार असल्याची माहिती प्रसिद्ध केल्याने या बैठकीसाठी आवश्यक ती पार्श्‍वभूमी तयार झाल्याचे दिसत आहे. या बैठकीत कोरोनाचा तपास करण्याची मागणी ‘जी7’ कडून अधिकृत पातळीवर केली जाऊ शकते. जी7च्या नेत्यांनी यासाठी निवेदन तयार केल्याचे वृत्त आहे.

युरोपिय महासंघाच्या प्रमुख ‘उर्सुला वॉन देर लेन’ यांनी कोरोनाचा तपास करण्याची फार मोठी आवश्यकता असल्याचे विधान करून चीनवरील दडपण वाढविले आहे. या साथीचे मूळ शोधण्यासाठी तपास अधिकार्‍यांना पूर्ण अधिकार मिळायला हवेत, असे सांगून उर्सुला वॉन देर लेन यांनी चीनला लक्ष्य केले. आधीच्या काळात चीनने जागतिक आरोग्य संघटनेच्या तपास पथकाला आपल्या वुहान प्रयोगशाळेत तपासाची परवानगी नाकारली होती. त्या पार्श्‍वभूमीवर युरोपिय महासंघाच्या प्रमुखांनी केलेली ही मागणी लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply