तालिबानच्या राजवटीला मान्यता नाकारल्यामुळे आयएसचे फावले

- तालिबानच्या परराष्ट्रमंत्र्याचा अजब दावा

राजवटीला मान्यताकाबुल – आंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानच्या राजवटीला मान्यता देण्याचे नाकारल्यामुळे आयएसला फायदा मिळत असल्याचा अजब दावा तालिबानचा हंगामी परराष्ट्रमंत्री अमीर खान मोत्ताकी याने केला. त्याचवेळी आयएसपासून अफगाणिस्तानला धोका नसल्याचेही मोत्ताकीने सांगितले. पण अफगाणिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी तालिबानला वास्तव्याची जाणीव करुन दिली. तालिबानच्या राजवटीला अफगाणी जनतेकडून वैधता मिळाली तरच आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळेल, अशा शब्दात माजी राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांनी तालिबानला फटकारले.

तालिबानने काबुलची सत्ता ताब्यात घेतल्यानंतर आयएस या दहशतवादी संघटनेने अफगाणिस्तानात वेगाने डोके वर काढले आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये आयएसने अफगाणिस्तानातील शियापंथियांच्या दोन प्रार्थनास्थळांवर आत्मघाती हल्ले चढवून १६० हून अधिक जणांचा बळी घेतला. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील शियापंथियांवर यापुढेही हल्ले सुरू राहतील, अशी धमकी आयएसने दिली.

अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानला दहशतवाद्यांचे केंद्र बनू देणार नसल्याची घोषणा करणार्‍या तालिबानवर टीका होत आहे. तुर्कीतील आघाडीच्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत, तालिबानच्या हंगामी परराष्ट्रमंत्र्याने आयएसपासून अफगाणिस्तानच्या सुरक्षेला कुठलाही धोका नसल्याचे सांगितले. पण त्याचवेळी आंतरराष्ट्रीय समुदायचे तालिबानविरोधी धोरण आयएसला सहाय्यक ठरत असल्याचा आरोप मोत्ताकीने केला.

राजवटीला मान्यताआंतरराष्ट्रीय समुदायाने तालिबानच्या राजवटीला मान्यता नाकारल्यामुळे आयएसच्या दहशतवाद्यांचे फावल्याचे विधान मोत्ताकीने केले. त्याचबरोबर अफगाणिस्तानातील आयएसच्या हल्ल्यांपेक्षाही आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मिळणारे अर्थसहाय्य सर्वात महत्त्वाचे असल्याचे मोत्ताकीने सदर मुलाखतीत सांगितले. मात्र अफगाणिस्तानच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी तालिबानच्या राजवटीवर ताशेरे ओढले.

आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता मिळविण्याआधी तालिबानने अफगाणिस्तानात निवडणूक घेऊन अफगाणी जनतेकडून कायदेशीर मान्यता मिळवावी. तसे शक्य झाले, अफगाणींनी तालिबानला स्वीकारले तरच आंतरराष्ट्रीय स्तरातून तालिबानला मान्यता मिळेल, असे माजी राष्ट्राध्यक्ष करझाई यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केले. अफगाणिस्तान सध्या अवघड वळणावर असून अफगाणी जनतेने देशाच्या आणि स्वत:च्या भविष्यासाठी एकजूट करणे आवश्यक असल्याचे करझाई म्हणाले.

त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबानची वकिली करणार्‍या पाकिस्तानची करझाई यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. अफगाणिस्तानच्या कारभारात हस्तक्षेप करून, कट्टरवाद व दहशतवादाला प्रोत्साहन देत असलेल्या पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या राजकारणात लुडबूड करू नये, अशा शब्दात माजी राष्ट्राध्यक्ष करझाई यांनी पाकिस्तानचा समाचार घेतला.

leave a reply