भारताच्या परराष्ट्रमंत्र्याची अमेरिका, रशियासह प्रमुख देशांच्या परराष्ट्रमंत्र्याशी चर्चा

भारताच्या परराष्ट्रमंत्र्याची अमेरिका, रशियासह प्रमुख देशांच्या परराष्ट्रमंत्र्याशी चर्चा

नवी दिल्ली – जगभरात कोरोनाव्हायरसची साथ हाहाकार माजवित असताना भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गुरुवारी अमेरिका, रशिया, ब्राझील, सौदी अरेबिया आणि ओमानच्या परराष्ट्रमंत्र्याशी फोनवरून चर्चा केली. कोरोनाव्हायरसची साथ आणि इतर राजकीय घडामोडीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी या देशांच्या परराष्ट्रमंत्र्याशी चर्चा केली.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांच्याबरोबरील चर्चेत कोरोनाव्हायरस आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चर्चा पार पडली. तसेच दोन्ही नेत्यांमध्ये अफगाणिस्तानातील परिस्थितीचा मुद्दा ऐरणीवर होता. अमेरिका आणि तालिबानमधला शांतीकरार धोक्यात आलेला असताना या दोन देशांमध्ये झालेली चर्चा लक्ष वेधून घेणारी ठरते. तर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लॅव्हरोह यांच्याबरोबरील चर्चेत कोरोनाव्हायरस हा मुद्दा ऐरणीवर होताच. पण त्याचवेळी येत्या काही दिवसात ब्रिक्स देशांच्या परराष्ट्रमंत्र्याची बैठक संपन्न होणार आहे. त्याच्यावरही उभय देशांच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. तसेच यावेळी अफगाणिस्तानचा मुद्दा अग्रस्थानी होता. रशिया भारताचा विशेष मित्रदेश असल्याचे सांगून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी रशियाचे महत्त्व अधोरेखित केले. ब्राझीलचे परराष्ट्रमंत्री एर्नेस्टो अराजो यांच्याशी कोरोनाव्हायरस व्यक्तिरिक्त जानेवारी महिन्यात ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या भारतभेटीविषयी चर्चा झाली.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सौदी अरेबियातल्या भारतीयांकडे विशेष लक्ष पुरविल्याबद्दल परराष्ट्रमंत्री सौद- अल-फजल यांचे आभार मानले. सौदी अरेबिया हा भारताचा विश्वासू भागीदार राहील, अशी ग्वाही जयशंकर यांनी यावेळी दिली. तर ओमानमधल्या भारतीयांना आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविणाऱ्या ओमानच्या परराष्ट्रमंत्री युसूफ अलावी यांच्याकडे जयशंकर यांनी आभार मानले. तसेच विश्वासू भागीदार देश म्हणून भारत ओमानला कोरोनाव्हायरसच्या संकटाच्या काळात सर्वोतोपरी सहाय्य करीन, असे आश्वासन दिले. तर शुक्रवारी परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी झेक रिपब्लिक आणि नायजेरियाच्या परराष्ट्रमंत्र्याशी फोननरुन चर्चा केली. आतापर्यंत कोरोनाव्हायरसचा सामना करण्यासाठी भारताने जवळपास १०८ देशांना वैद्यकीय सहाय्य पुरविले आहे. या अत्यंत अवघड काळात भारताने दिलेल्या या योगदानाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक होत आहे. त्यामुळे जगभरातील भारताचा प्रभाव अधिकच वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जातो.

leave a reply