भारत व रशियाच्या परराष्ट्र सचिवांमध्ये ‘एलएसी’वर चर्चा

India-Russia-LACनवी दिल्ली – भारत व चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि रशियाच्या परराष्ट्र सचिवांमध्ये फोनवरून ‘एलएसी’वर चर्चा पार पडली. यावेळी भारताच्या आवश्यकतेनुसार रशिया भारताला संरक्षण साहित्य पुरविल, असे आश्वासन यावेळी रशियाने भारताला दिले आहे. रशियाने ‘इंडो पॅसिफिक’धोरणात भारताबरोबर सहभागी व्हावे अशी भारताची इच्छा असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन ऑक्टोबर महिन्यात भारताच्या भेटीवर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारत व रशियामध्ये झालेली ही चर्चा महत्त्वाची ठरते.

India-Russiaमंगळवारी भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रुंगला आणि रशियाचे परराष्ट्र सचिव इगोर मोरगोल्व यांची फोनवरून चर्चा पार पडली. यावेळी द्विपक्षीय सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक मुद्दे अग्रस्थानी होते. कोरोनाव्हायरसमुळे ‘ब्रिक्स’ आणि ‘एससीओ’ची परिषद पुढे ढकलण्यात आली होती. येत्या काही महिन्यात या दोन्ही बैठका संपन्न होणार आहे. पण व्हर्च्युअल परिषद न होता प्रत्यक्ष परिषद व्हावी, असे भारत आणि रशियाला वाटत आहे. यावर दोन्ही सचिवांनी चर्चा केली. यावेळी भारत आणि रशियामध्ये चीन सीमेवरील तणावावरही चर्चा पार पडली. पण त्याचे अधिक तपशील प्रसिद्ध झालेले नाहीत.

रशिया भारताच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक आहे. तर भारत रशियाच्या इंधन क्षेत्रात गुंतवणूक करायला तयार आहे. भारत व चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर रशिया भारताला १२ ‘सुखोई-३०एमकेआय’ आणि २१ ‘मिग-२९’ अशी ३३ विमाने अल्पावधीतच पुरविणार आहे. या चर्चेत रशियाने पुन्हा एकदा याबाबत भारताला आश्वस्त केले आहे. यापूर्वी जून महिन्यात रशियाने ‘व्हिक्टरी डे’ परेडमध्ये भारताला आमंत्रित करुन चीनला योग्य तो संदेश दिल्याचे मानले जाते.

leave a reply