केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते ‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवेचा शुभारंभ

नवी दिल्ली – देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून ‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवा पुरविण्यात येणार असून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या सेवेचा शुभारंभ केला. यानुसार बँका आता अधिक ग्राहक तत्पर होणार असून सरकारी बँका नियमित देत असलेल्या सर्व सुविधा ग्राहकांना थेट दारात जाऊन देणार आहेत. ‘डोअरस्टेप बँकिंग’ एजंट्सद्वारे या सेवा पुरविल्या जातील . ग्रामीण भागातील नागरिक, जेष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना यामुळे बँकिंग सेवेचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे.

'डोअरस्टेप बँकिंग'

‘एन्हान्स एक्सेस एंड सर्विस एक्सलन्स’ या कार्यक्रमांतर्गत स्मार्ट बँकिंगवर भर देण्यात येत आहे. याअंतर्गत ‘डोअरस्टेप बँकिंग’ची सुविधा सुरु करण्यात आली आहे. याद्वारे ग्राहकांना घरबसल्या अनेक बँकिंग सेवेचा लाभ घेता येणार आहे. सध्या केवळ बिगर आर्थिक सेवा या माध्यमातून दिल्या जाणार आहेत. चेक घेणे, डिमांड ड्राफ्ट आणि पे-ऑर्डर, नवीन चेकबुकसाठी अर्ज स्लिप, विविध फॉर्म, खाते निवेदनासाठी अर्ज, चेकबुक वितरित करणे, मुदत ठेव पावतीचे वितरण, टीडीएस-फॉर्म -१ चे वितरण इत्यादी सेवांचा समावेश आहे.

पण या नव्या सेवेत क्रेडिट अ क्लिक, डायल-अ-लोन, बँकिंग-ऑन-द-गो यांसारख्या योजनांचा लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. मात्र या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे. या सर्व सेवांचा लाभ ऑक्टोबर महिन्यापासून मिळेल. ‘डोअरस्टेप बँकिंग’ ही सेवा ज्यांना बँकेत येण्यास त्रास होतो अशा ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगासाठी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. परंतु कोरोना साथीकडे पाहता आता ही सेवा सर्वांसाठीसुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.

‘बँकांनी क्रेडिट रेटिंग एजन्सींच्या अहवालांवर विसंबून न राहता बँकांनी त्यांच्या ग्राहकांबरोबर प्रत्यक्ष संवाद साधण्यावर भर द्यावा. ग्राहकाशी थेट संबंध प्रस्थापित करताना योग्य ते तंत्रज्ञान वापरण्याची, पण त्याचवेळी केवळ तंत्रज्ञानाच्या दुव्यावर अवलंबून न राहण्याची,’ सूचना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यावेळी केली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंग ठाकूर, अर्थसचिव राजीव कुमार, इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष आणि भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार उपस्थित होते.

leave a reply