‘डीआरडीओ’कडून रणगाडाभेदी ‘सॅन्ट’ क्षेपणास्त्राची चाचणी

'सॅन्ट'बालासोर – सोमवारी ओडिशाच्या समुद्र किनाऱ्यावरून ‘स्टँड ऑफ अँटी टॅंक (सॅन्ट) या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. गेल्या काही दिवसात भारतीय संरक्षणदलांनी १२ क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या आहेत. भारत आणि चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून क्षेपणास्त्राच्या घेण्यात येत असलेल्या चाचण्या लक्ष वेधून घेत आहेत.

‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’तर्फे (डीआरडीओ) ‘सॅन्ट’ या रणगाडाभेदी गाईडेड क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र हेलिना क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे. हेलिना क्षेपणास्त्र मारक क्षमता ७ ते ८ किलोमीटर होती. तर ‘सॅन्ट’ क्षेपणास्त्र १५ ते २० किमीवरील लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास सक्षम आहे.

'सॅन्ट'‘एएलएच रुद्र एमके ४’ आणि हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर्ससाठी ‘सॅन्ट’ या हवेतून मारा करणाऱ्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय वायुसेना आणि भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कोरने (एएसी) एकत्रितरित्या चार हजार ‘सॅन्ट’ क्षेपणास्त्राची मागणी केली आहे. डीआरडीओकडून २०२१ च्या अखेरपर्यंत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात येणार आहेत.

रविवारीच नौदलाच्या स्टेल्थ विनाशिकेवरुन ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली होती. ‘डीआरडीओ’ आणि भारतीय संरक्षणदलांनी ‘सॅन्ट’ क्षेपणास्त्रासह मागील पाच आठवड्यात १२ निरनिराळ्या क्षेपणास्त्रांच्या १३ चाचण्या घेतल्या आहेत. चीन सीमेवर तणाव वाढत असतांना घेण्यात आलेल्या या चाचण्या चीनसाठी इशारा ठरतात.

leave a reply