अंमली पदार्थांची तस्करी व हिंसाचार रोखण्यासाठी इक्वेडोरमध्ये आणीबाणीची घोषणा

क्विटो – इक्वेडोरचा एकच शत्रू आहे व तो म्हणजे अंमली पदार्थांची तस्करी, असे सांगून इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष गुलिर्मो लॅसो यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली. पुढील दोन महिन्यांसाठी ही आणीबाणी लागू राहणार असून देशाच्या विविध भागांमध्ये लष्कर तैनात करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात इक्वेडोरमधील एका तुरुंगात अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या दोन टोळ्यांमध्ये जबरदस्त संघर्ष झाला होता. या संघर्षात सुमारे १२० जणांचा बळी गेला होता. या पार्श्‍वभूमीवर आणीबाणीची घोषणा करण्यात आल्याचे दिसत आहे.

‘पूर्वी इक्वेडोर हा अंमली पदार्थांच्या तस्करीतील एक महत्त्वाचा भाग मानला जायचा. मात्र आता केवळ तस्करीच नाही तर अंमली पदार्थांचा वापर करणार्‍या देशांमध्येही या देशाचा समावेश झाला आहे. देशातील अंमली पदार्थांचा व्यापार व विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचवेळी देशात घडणार्‍या वाढत्या गुन्ह्यांमागेही अंमली पदार्थांचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध असल्याचे दिसून आले आहे’, या शब्दात राष्ट्राध्यक्ष गुलिर्मो लॅसो यांनी आणीबाणीचे समर्थन केले. सरकारकडून देशाच्या विविध भागांमध्ये अतिरिक्त सुरक्षायंत्रणांसह लष्करी तुकड्या तैनात करण्यात येणार आहेत.

या यंत्रणांना अतिरिक्त अधिकारही देण्यात आले असून, स्वतंत्र ‘लीगल डिफेन्स युनिट’ही उभारण्यात येणार आहे. अंमली पदार्थांच्या टोळ्यांविरोधात कारवाई करणार्‍या यंत्रणांना कोणत्याही प्रकारे कायदेशीर अडथळ्यांचा मुकाबला करायला लागू नये, यासाठी हे युनिट काम करेल, असे राष्ट्राध्यक्ष गुलिर्मो लॅसो यांनी सांगितले. गुन्हेगारी टोळ्या कुठेही लपून बसल्या तरी त्यांचा शोध घेऊन सरकार त्यांच्याशी संघर्ष करेल, असा इशाराही राष्ट्राध्यक्षांनी दिला.

गेल्या काही महिन्यात जगातील अनेक देशांमध्ये अंमली पदार्थांचे मोठे साठे पकडण्यात आले आहेत. ही बाब अंमली पदार्थांच्या व्यापारात पुन्हा वाढ होत असल्याचे संकेत देणारी ठरते. अमेरिकेतील यापूर्वीच्या सरकारने अंमली पदार्थांविरोधात आक्रमक मोहीम राबविली होती. मात्र नवे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर अंमली पदार्थांचे उत्पादन व तस्करीला अधिक वेग मिळाल्याचेही समोर येत आहे.

अफुची शेती व अंमली पदार्थांचा व्यापार हे तालिबानला अर्थसहाय्य करणारे प्रमुख घटक असल्याचे विविध आंतरराष्ट्रीय अहवालांमधून समोर आले आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तालिबानविरोधात राबविलेल्या आक्रमक मोहिमेत अफगाणिस्तानमधील अफुची शेती असणार्‍या भागांवर तसेच कारखान्यांवर हल्ले चढविले होते. मात्र त्यानंतर पुन्हा तालिबानने अंमली पदार्थांच्या व्यापारावर वर्चस्व मिळविले असून त्याला पाकिस्तानी यंत्रणांचीही साथ असल्याचे याआधी अनेकवार स्पष्ट झाले होते.

leave a reply