‘रेड सी’मध्ये इजिप्त व स्पेनचा संयुक्त नौदल सराव

- सात दिवसात दोन सरावांचे आयोजन

कैरो – अवघ्या सात दिवसांच्या अवधीत इजिप्त व स्पेनमध्ये एकापाठोपाठ एक असे दोन नौदल सराव पार पडले आहेत. ‘रेड सी’ सागरी क्षेत्रात हे सराव झाल्याची माहिती इजिप्तच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. रेड सी क्षेत्रात शांतता व स्थैर्य कायम राखण्यासाठी दोन देशांमधील सागरी सहकार्याची व्याप्ती वाढणे आवश्यक आहे, या शब्दात इजिप्तने एकापाठोपाठ पार पडलेल्या संयुक्त नौदल सरावांचे समर्थन केले आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यात इजिप्तच्या नौदलाच्या ‘सदर्न फ्लीट’चा भाग असलेल्या रेड सीमधील ‘बर्निस नॅव्हल बेस’जवळ इजिप्त व स्पेनच्या नौदलाचा ‘पासिंग एक्सरसाईज’ पार पडला. यात इजिप्तकडून ‘शर्म अल-शेख’ ही विनाशिका व ‘जून १८’ ही मिसाईल बोट सहभागी झाली होती. रविवारी १४ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या सरावात स्पेनकडून गॅलिशिआ क्लास प्रकारातील ‘कॅस्टिला एलपीडी’ ही युद्धनौका सामील झाली होती. या सरावात ‘मेरिटाईम सप्लाय ऑपरेशन्स’, ‘कम्युनिकेशन ड्रिल्स’ व ‘हेलिकॉप्टर डॉकिंग’चा अभ्यास करण्यात आल्याची माहिती इजिप्तने दिली.

त्यानंतर शनिवारी २० फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा इजिप्त व स्पेनच्या नौदलात संयुक्त सराव आयोजित करण्यात आला. यात इजिप्तकडून ‘शर्म अल-शेख’ ही विनाशिका तर स्पेनकडून ‘इएसपीएस रीना सोफिआ’ विनाशिका सहभागी झाली होती. रेड सीमधील ‘सदर्न फ्लीट’चा भाग असलेल्या क्षेत्रातच सराव झाल्याची माहिती इजिप्तच्या नौदलाने दिली. स्पेनच्या नौदलाकडे असलेला मोठा अनुभव व कौशल्याचा फायदा घेण्याच्या उद्देशाने एकापाठोपाठ एक दोन सराव घेण्यात आल्याचा दावा इजिप्तकडून करण्यात आला आहे.

इजिप्तकडून रेड सी क्षेत्रात घेण्यात आलेले सराव प्रमुख प्रतिस्पर्धी असणार्‍या तुर्कीचा प्रभाव रोखण्याच्या प्रयत्नांचा भाग मानला जातो. गेल्या काही वर्षात तुर्कीने सोमालिया व सुदानबरोबर संरक्षण सहकार्य वाढवून ‘रेड सी’ क्षेत्रातील आपले वर्चस्व वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे इजिप्त अस्वस्थ असून त्याने इतर देशांबरोबर आघाडी उघडून तुर्कीच्या कारवायांना शह देण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षभरात इजिप्तनेही ग्रीस, संयुक्त अरब अमिरात(युएई) व सुदानबरोबर लष्करी सहकार्य वाढविण्यास सुरुवात केली आहे. स्पेनसारख्या प्रमुख युरोपिय देशाबरोबर सरावांची व्याप्ती वाढविणे लष्करी सहकार्य व मित्रदेशांची आघाडी मजबूत करण्याच्या योजनेचा भाग असू शकतो, असे मानले जात आहे.

leave a reply