नाटोच्या मुख्यालयातून रशियाच्या आठ अधिकार्‍यांची हकालपट्टी

- लवकरच प्रत्युत्तर देण्याचा रशियाचा इशारा

ब्रुसेल्स/मॉस्को – ब्रुसेल्स येथील मुख्यालयात राजनैतिक अधिकारी म्हणून काम करणार्‍या रशियाच्या आठ जणांची नाटोने हकालपट्टी केली. हे सर्वजण हेरगिरी करीत असल्याचा आरोप नाटोने केला. यानंतर रशिया आणि नाटोतील संबंध अधिकच खालावल्याची टीका नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी केली. तर आपल्या अधिकार्‍यांची हकालपट्टी करणार्‍या नाटोला लवकरच प्रत्युत्तर मिळेल, असा इशारा रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्हा यांनी दिला.

नाटोच्या मुख्यालयातून रशियाच्या आठ अधिकार्‍यांची हकालपट्टी - लवकरच प्रत्युत्तर देण्याचा रशियाचा इशाराब्रिटनच्या आघाडीच्या वृत्तवाहिनीने नाटोच्या मुख्यालयातील रशियन अधिकार्‍यांवरील या कारवाईची माहिती उघड केली. ब्रुसेल्स येथील मुख्यालयात काम करणारे रशियन राजनैतिक अधिकारी हेरगिरीचे नेटवर्क चालवत होते. सदर अधिकारी नाटोच्या मुख्यालयातील संवेदनशील माहिती रशियन गुप्तचर यंत्रणेला पुरवित होते, असा आरोप ब्रिटिश वृत्तवाहिनीने नाटोतील सूत्रांच्या हवाल्याने केले. यातील काही रशियन अधिकार्‍यांवर हत्येचा आरोप असल्याचा दावा सदर वृत्तवाहिनीने केला.

नाटोचे प्रमुख जेन्स स्टोल्टनबर्ग यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना, रशियन अधिकारी धोकदायक कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका ठेवला. तसेच यापुढे नाटोतील रशियन राजनैतिक अधिकार्‍यांची संख्या २० वरुन १० करण्यात येईल, असे स्टोल्टनबर्ग यांनी जाहीर केले. रशियाच्या चुकीच्या वर्तनामुळे शीतयुद्धानंतर पहिल्यांदा रशिया व नाटोतील संबंध इतके खालावल्याची टीका स्टोल्टनबर्ग यांनी केली. नाटोच्या मुख्यालयातून रशियाच्या आठ अधिकार्‍यांची हकालपट्टी - लवकरच प्रत्युत्तर देण्याचा रशियाचा इशारानाटोने केलेल्या या कारवाईवर रशियाकडून प्रतिक्रिया आली आहे. ‘सहकार्याने प्रश्‍न सोडविण्याची नाटोकडे इच्छाशक्ती नाही, हे नव्याने स्पष्ट झाले आहे. रशिया प्रतिशोधात्मक कारवायांवर विचार करीत असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल’, असे रशियन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोव्ह यांनी बजावले. रशिया कोणत्या स्वरुपात प्रत्युत्तर देणार हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. पण अमेरिकाही रशियाच्या शेकडो राजनैतिक अधिकार्‍यांच्या हकालपट्टीचा विचार करीत असून बायडेन प्रशासनाकडे तशी मागणी झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

दरम्यान, नाटोच्या प्रमुखांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये घेतलेल्या भेटीनंतर अवघ्या काही दिवसातच ही कारवाई केली आहे.

leave a reply