भारतीय लष्कराच्या घणाघाती प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे ११ जवान ठार

श्रीनगर – पाकिस्तानच्या लष्कराने संघर्षबंदीचे उल्लंघन करुन काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर चढविलेल्या हल्ल्यात भारताचे चार सैनिक शहीद झाले असून सहा नागरिकांचा बळी गेला. यानंतर खवळलेल्या भारतीय सैनिकांनी घणाघाती हल्ला चढवून पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या, बंकर्स आणि इंधनाचे साठे उद्‍ध्वस्त करुन ११ पाकिस्तानी जवानांना ठार केले. या हल्ल्यात दहशतवाद्यांचे लाँचपॅड्स देखील नष्ट झाल्याची माहिती समोर येत आहे.

११ जवान ठार

पाकिस्तानने यावर्षभरात आत्तापर्यंत चार हजारांहून अधिकवेळा संघर्षबंदीचे उल्लंघन केले आहे. या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी जवानांनी भारताच्या सुरक्षा चौक्यांबरोबर सीमाभागातील नागरी वस्त्यांवरही हल्ले चढविले आहेत. या हल्ल्यांमध्ये भारताचे किमान २० सैनिक शहीद झाले असून २४ हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. नियंत्रण रेषेजवळील पुंछ, कुपवाडा या जिल्ह्यांना पाकिस्तानी लष्कराने लक्ष्य केले असून शुक्रवारी सकाळी देखील नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला, दावर, केरान, उरी आणि नौगाव या सेक्टर्समध्ये पाकिस्तानी लष्कराने मॉर्टर्सचे हल्ले चढविले होते. पाकिस्तान जाणुनबुजून सीमेवरील नागरी वस्त्यांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप भारतीय लष्कराच्या वरिष्ठ अधिकारी करीत आहेत.

या हल्ल्यासाठी पाकिस्तानी लष्कराने जाणीवपूर्वक दिवाळीचा काळ निवडला, असा आरोप भारताचे माजी लष्करी अधिकारी करीत आहेत. काश्मीरमध्ये हिमवृष्टी सुरू होण्याच्या आधी शक्य तितक्या प्रमाणात दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणणे, हा पाकिस्तानच्या या हल्ल्यामागील हेतू होता. यात चार सैनिक शहीद झाले व सहा नागरिकांचा बळी गेला व बळींमध्ये महिला आणि एका बालकाचा समावेश आहे. यानंतर खवळलेल्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उडवून दिल्या. याचे व्हिडिओ फुटेजही प्रसिद्ध झाले आहेत. पाकिस्तानी लष्कराचे बंकर्स तसेच इंधनाचे साठेही या हल्ल्यात नष्ट झाले असून किमान ११ पाकिस्तानी जवान या हल्ल्यात ठार झाल्याचे वृत्त आहे.

भारतीय लष्कराने अशारितीने खोड मोडल्यानंतर पाकिस्तानात शांतता पसरली आहे व अधिकृत पातळीवर पाकिस्तानने यावर प्रतिक्रिया नोंदविलेली नाही. मात्र, भारतीय वृत्तवाहिन्यांवर बोलताना पाकिस्तानच्या काही पत्रकार व विश्लेषकांनी हा हल्ला म्हणजे भारताचा अपप्रचार असल्याचे दावे ठोकले आहेत. त्याला उत्तर देताना, भारताच्या माजी लष्करी अधिकार्‍यांनी भारत अशारितीनेच दिवाळी साजरी करीत राहिल, असा खणखणीत इशारा दिला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करुन देशवासियांनी या सैनिकांसाठी एक दिवा लावा, असे आवाहन केले आहे.

leave a reply