‘युरोपियन आर्मी’मुळे युरोपचे विभाजन होईल

- नाटोच्या प्रमुखांचा इशारा

ब्रुसेल्स/जीनिव्हा – ‘युरोपियन देशांनी संरक्षणासाठी पुढाकार घेऊन अधिक प्रयत्न करणे नक्कीच स्वागतार्ह आहे. पण ही बाब नाटोची जागा घेणारी ठरु शकत नाही. युरोप व अमेरिका एकत्र राहतील याची काळजी आपण घ्यायला हवी. अमेरिका व युरोपमधील बंध कमकुवत करण्याचे प्रयत्न नाटोला कमजोर करण्याबरोबच युरोपच्या विभाजनासाठीही कारणीभूत ठरु शकतात’, असा इशारा नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी दिला.

अफगाणिस्तानातील अमेरिकेची सैन्यमाघार ‘डिझास्टर’ ठरल्याची टीका सर्वच क्षेत्रातून होत आहे. अमेरिकेचे परंपरागत मित्रदेश असणार्‍या युरोपिय देशांनीही अमेरिकेच्या निर्णयावर टीकेची झोड उठविली असून ही माघार मोठी चूक ठरल्याचे बजावले आहे. याच पार्श्‍वभूमीवर अमेरिका व युरोपमधील संबंधही ताणले गेल्याचे चित्र समोर येत आहे. या तणावाच्या स्थितीत युरोपिय देशांमधून पुन्हा एकदा स्वतंत्र ‘युरोपियन आर्मी’ची मागणी जोर धरू लागली आहे.

महासंघाचे परराष्ट्र प्रमुख जोसेप बॉरेल यांनी स्लोव्हेनियात झालेल्या एका बैठकीत यासंदर्भातील प्रस्ताव पुढे आणल्याचे सांगण्यात येते. बॉरेल यांनी युरोपिय महासंघाचा स्वतंत्र ‘फर्स्ट एन्ट्री फोर्स’ असावा व त्यात किमान पाच हजार जवानांचा समावेश असावा, अशी संकल्पना पुढे केली आहे. काही युरोपिय देशांनी या फोर्समध्ये २० हजारांपर्यंत जवानांचा समावेश असावा, अशी भूमिका घेतली आहे. बॉरेल व इतर देशांकडून आलेले हे प्रस्ताव ‘युरोपियन आर्मी’ उभारण्याच्याच प्रयत्नांचा भाग असल्याचे दिसत आहे.

स्वतंत्र युरोपियन आर्मीच्या प्रस्तावावर नाटोने यापूर्वीही नाराजी व्यक्त केली होती. आताही नाटोचे प्रमुख जेन्स स्टॉल्टनबर्ग यांनी नाराजी व्यक्त करताना थेट युरोपच्या विभाजनाचा इशारा दिला. यावेळी त्यांनी नाटोच्या विस्ताराबद्दल सांगताना हा विस्तार युरोपच्या सुरक्षेच्या दृष्टिने आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी स्वतंत्र ‘युरोपियन आर्मी’ची उद्दिष्टे, रचना व कमांड हे सर्व नाटोची ‘डुप्लिकेट’ ठरण्याचा धोका आहे, याकडेही लक्ष वेधले.

युरोपिय महासंघातील काही देशांकडून गेल्या दोन दशकांपासून स्वतंत्र युरोपियन आर्मीची संकल्पना पुढे आणली जात आहे. यात जर्मनी व फ्रान्सचा पुढाकार असून त्यांनी इतर देशांचे समर्थन मिळविण्यातही यश मिळविले आहे. मात्र ब्रिटनसारख्या देशांनी त्याला जोरदार विरोध केला होता. स्वतंत्र युरोपियन आर्मीची तयारी म्हणून महासंघाने प्रत्येकी दीड हजार जवानांचा समावेश असलेले दोन ‘बॅटलग्रुप्स’ही उभारले आहेत. मात्र ते आजतागायत कधीही तैनात करण्यात आलेले नाहीत. पण ‘ब्रेक्झिट’नंतर महासंघातील सदस्य देशांनी पुन्हा एकदा युरोपियन आर्मीसाठी नव्याने प्रयत्न सुरू केले असून महासंघाच्या संरक्षण धोरणातही त्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

leave a reply