कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युरोपिय अर्थव्यवस्थेला जबरदस्त मोठा धक्का बसेल – जर्मनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा इशारा

बर्लिन – ‘कोरोनामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनचे परिणाम अद्यापही समोर आलेले नाहीत. बँकिंग क्षेत्राला त्याचा फटका सहन करावा लागणार आहे. आर्थिक पातळीवर बसणाऱ्या धक्क्याच्या व्याप्तीबद्दल भाकीत करणे अवघड आहे. पण अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळत असताना बँकिंग क्षेत्राला बसणारा हा धक्का जबरदस्त मोठा असेल’, असा इशारा जर्मनीचे वरिष्ठ अधिकारी जोआकिम वर्मेलिंग यांनी दिला. गेल्या काही दिवसात युरोपिय देशांमध्ये कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याची माहिती समोर येत असून काही देशांनी दुसऱ्या लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जर्मन अधिकाऱ्यांचा इशारा लक्ष वेधून घेणारा ठरतो.

युरोपिय अर्थव्यवस्था

युरोपात सुमारे ५३ लाख लोकांना कोरोनाव्हायरसचा संसर्ग झाला असून त्यात आतापर्यंत दोन लाख २५ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला आहे. युरोपमधील ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली व स्पेन या देशांमध्ये साथीने हाहाकार उडवला आहे. या साथीचे आर्थिक परिणामही समोर येण्यास सुरुवात झाली असून जगातील बहुतांश प्रमुख गट व संस्थांनी युरोपला आर्थिक मंदीचा जबरदस्त फटका बसेल, असे भाकित वर्तविले आहे. काही महिन्यांपूर्वी युरोपमधील आघाडीच्या अर्थव्यवस्था असणाऱ्या जर्मनीसह फ्रान्स, ब्रिटनने मंदीची घोषणाही केली होती.

युरोपिय अर्थव्यवस्था

कोरोनामुळे आलेल्या आर्थिक संकटातून युरोपला बाहेर काढण्यासाठी मे महिन्यात ७५० अब्ज युरोंच्या ‘रिकव्हरी प्लॅन’ची घोषणा करण्यात आली होती. युरोपियन कमिशनकडून करण्यात आलेली ही घोषणा युरोपच्या इतिहासातील सर्वात मोठे आर्थिक पॅकेज मानले जाते. ‘नेक्स्ट जनरेशन ईयु’ असे युरोपीय कमिशनने जाहीर केलेल्या योजनेचे नाव असून ५०० अब्ज युरो अनुदानाच्या रूपात, तर २५० अब्ज युरो कर्ज म्हणून देण्यात येणार आहेत. मात्र या ऐतिहासिक पॅकेजनंतरही युरोपिय अर्थव्यवस्था सावरणार नसल्याचे संकेत जर्मन अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावरून मिळत आहेत.

युरोपिय अर्थव्यवस्था

जोआकिम वर्मेलिंग हे जर्मनीची मध्यवर्ती बँक ‘बुंडेसबँक’च्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांनी दिलेला इशारा जर्मन अर्थव्यवस्थेसाठीही नव्या संकटाची चाहूल असल्याचे मानले जाते. ‘युरोपातील अनेक कंपन्यावर मोठे संकट ओढवू शकते. त्यामुळे या कंपन्या कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत. त्यामुळे बँकिंग क्षेत्राला जबर फटका बसेल’, असे जोआकिम वर्मेलिंग यांनी आपल्या इशाऱ्यात म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी युरोपिय कमिशनने प्रसिद्ध केलेल्या अहवालात, २०२० साली युरोपची अर्थव्यवस्था तब्बल आठ टक्क्यांनी घसरुन तीव्र मंदीत जाऊ शकते, असे बजावले होते. जर्मन अधिकाऱ्यानी दिलेला इशारा
त्याला दुजोरा देणारा ठरतो.

leave a reply