डेल्टा प्लस व्यतिरिक्त कोरोनाच्या चार व्हेरियंटबाबत तज्ज्ञांकडून चिंता

नवी दिल्ली – कोरोनाचे चार व्हेरियंट भारतासाठी धोकादायक ठरू शकतात, अशा चिंता व्यक्त करणार्‍या बातम्या येत आहेत. यातील दोन व्हेरियंट भारतात आढळलेले आहेत. तर लॅम्बडा नावाचा व्हेरियंट परदेशात वेगाने पसरत असून तो भारतात येण्याचा धोका संभवतो. त्यामुळे या चार व्हेरियंटकडे बारकाईने नजर ठेवण्याची व जिनोम सिक्वेन्सच्या चाचण्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

डेल्टा प्लस व्यतिरिक्त कोरोनाच्या चार व्हेरियंटबाबत तज्ज्ञांकडून चिंताभारतात दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. मात्र तिसरी लाट लवकरच येण्याचा इशारा वारंवार तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर देशात पुन्हा कोरोनाचे संक्रमण वाढण्यासाठी कोरोनाचे चार व्हेरियंट धोकादायक ठरू शकतील, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. बी.1.617.1 या व्हेरियंटचा यामध्ये समावेश आहे. डब्ल्यूएचओने त्याला कप्पा असे नाव दिले आहे. याशिवाय बी.1.617.2 अर्थात डेल्टा कुटुंबातील बी.1.617.3 हा स्ट्रेनही धोकादायक ठरेल असा इशारा देण्यात येत आहे.

बी.1.617.2 आणि बी.1.617.3 हे दोन्ही व्हेरियंट सध्या भारतात आढळले आहेत. यातील बी.1.617.2 याला डेल्टा नावाने ओळखले जाते. बी.1.617.2 आणि बी.1.617.3 हे दोन्ही व्हेरियंट हे महाराष्ट्रात पहिल्यांदा आढळलेल्या बी.1.617 या डबल म्यूटंट व्हेरियंटमधून आले होते आणि सध्या ते कितीतरी देशात पसरले आहेत. तसेच बी.1.1.318 या कोरोनाच्या व्हेरियंटकडे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या व्हेरियंटचे आतापर्यंत 14 म्यूटेशन नोंदविण्यात आले आहेत. तसेच नुकताच लॅम्बडा (सी.37) हा कोरोनाचा आणखी एक व्हेरियंट सापडला असून हा व्हेरियंट ब्रिटनमध्ये आढळला आहे. हा व्हेरियंट हवाई प्रवास करून येणार्‍यांमार्फत भारतात येण्याचा धोका आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सध्या देशात डेल्टा प्लस व्हेरियंटची चर्चा होत आहे. मात्र या डेल्टा प्लस व्हेरियंट व्यतिरिक्त या चार व्हेरियंटचे संक्रमण पसरणार नाही, याकडेही लक्ष पुरविण्याची गरज आहे. त्यासाठी जिनोम सिक्वेन्सींग वाढविण्याची आवश्यकता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

leave a reply